US Iran Ceasefire: अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम करार झाल्यानंतर जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर पेंटागॉनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी अत्यंत धाडसी दावा केला आहे. ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ (Operation Epic Fury) हे ऐतिहासिकदृष्ट्या यशस्वी ठरले असून, इराणने स्वतःहून युद्धविरामासाठी याचना केली होती, असे हेगसेथ यांनी म्हटले आहे. इराणची लष्करी ताकद आता पूर्णपणे नेस्तनाबूत झाली असून ते पुढील अनेक वर्षे युद्ध लढण्याच्या स्थितीत नाहीत, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
केवळ 10 टक्के लष्करी ताकदीचा वापर आणि अफाट विनाश
संरक्षण सचिव हेगसेथ यांच्या मते, अमेरिकेने आपल्या एकूण लष्करी क्षमतेपैकी केवळ 10 टक्के ताकदीचा वापर करून जगातील एका मोठ्या सैन्याचा विनाश केला आहे. हे युद्ध 40 दिवसांपेक्षाही कमी काळ चालले. यामध्ये तेहरानविरुद्ध अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे आखलेली सर्व लष्करी उद्दिष्टे नियोजित वेळेत साध्य करण्यात आली. इराण स्वतःचे संरक्षण करण्यास पूर्णपणे असमर्थ ठरल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
क्षेपणास्त्र कार्यक्रम आणि नौदल संपुष्टात
‘इराणचे नौदल आता समुद्राच्या तळाशी विसावले आहे आणि त्यांच्याकडे कोणतीही प्रभावी हवाई संरक्षण यंत्रणा (Air Defense Systems) उरलेली नाही,’ असे पीट हेगसेथ यांनी सांगितले. अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचा संरक्षण-औद्योगिक पाया पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून, इराण आता भविष्यात नवीन क्षेपणास्त्रे तयार करू शकणार नाही, असा दावा पेंटागॉनकडून करण्यात आला आहे. इराणचा क्षेपणास्त्र कार्यक्रम नष्ट करणे हेच या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट होते.
अण्वस्त्रांचे स्वप्न भंगले; वरिष्ठ नेतृत्व ठार
या करारामुळे आता तेहरानकडे कधीही अण्वस्त्रे असणार नाहीत, हे स्पष्ट झाले असल्याचे हेगसेथ म्हणाले. त्यांनी या मोहिमेत ठार झालेल्या इराणच्या वरिष्ठ नेत्यांची यादीच सादर केली. इराण सरकारसमोर पूर्ण विनाशाचा धोका निर्माण झाला होता आणि त्यांच्याकडे वेळही शिल्लक नव्हती, त्यामुळेच त्यांनी तडजोडीचा मार्ग स्वीकारला, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
#WATCH | Washington, DC | United States Secretary of War, Pete Hegseth, says, "…President Trump forged this moment. Iran begged for this ceasefire, and we all know it…Operation Epic Fury was a historic and overwhelming victory on the battlefield…Operation Epic Fury… pic.twitter.com/dUSLl6FUvX — ANI (@ANI) April 8, 2026
13000 लक्ष्यांवर हल्ले; ‘युद्धविराम’ म्हणजे केवळ विश्रांती
‘जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ’चे अध्यक्ष जनरल डॅन केन यांनी लष्करी आकडेवारी सादर करताना सांगितले की, अमेरिकेने इराणमधील 13,000 हून अधिक लक्ष्यांवर अचूक हल्ले केले आहेत. यामध्ये इराणची 80 टक्के हवाई संरक्षण यंत्रणा, 90 टक्क्यांहून अधिक नौदल ताफा आणि 90 टक्के शस्त्रनिर्मिती सुविधा नष्ट झाल्याचा दावा त्यांनी केला. “हा युद्धविराम म्हणजे कायमस्वरूपी शांतता नसून केवळ एक तात्पुरती विश्रांती आहे. आदेश मिळताच आमचे लष्कर पुन्हा कारवाई करण्यास सज्ज आहे,” असा इशाराही जनरल केन यांनी दिला आहे.