इराणकडून होर्मुज सामुद्रधुनी पुन्हा पूर्णपणे बंद करण्यात आल्याचा दावा करणारा एक ऑडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या कथित ऑडिओमध्ये स्वतःला इराणी नौदलाशी संबंधित व्यक्ती सांगणारा आवाज म्हणताना ऐकू येतो की, “होर्मुज सामुद्रधुनी सतत बंद आहे आणि ती फक्त इमाम मुज्तबा खामेनेई यांच्या आदेशानंतरच पुन्हा उघडली जाईल.” मात्र या ऑडिओची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
या कथित संदेशात इराणी नौदलाने असेही म्हटल्याचा दावा केला जात आहे की, होर्मुजमधून जाणाऱ्या कोणत्याही जहाजाला आधी इराणी नौदलाची परवानगी घ्यावी लागेल. तसेच शत्रू देशांशी संबंधित जहाजे किंवा त्यांच्या सहयोगी देशांची जहाजे लक्ष्य केली जातील, अशी धमकीही देण्यात आल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स नौदलानेही होर्मुजमधून परवानगीशिवाय जाणाऱ्या जहाजांवर कारवाई करण्याचा इशारा दिल्याचे वृत्त आहे. “जो कोणी होर्मुज पार करण्याचा प्रयत्न करेल, त्याच्यावर हल्ला केला जाईल,” असा दावा या कथित संदेशात करण्यात आला आहे.
याआधी सय्यद अब्बास अराघची यांनी इस्लामाबादमध्ये अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर होर्मुज सामुद्रधुनी पुन्हा सुरक्षितपणे सुरू करण्यात आल्याचे जाहीर केले होते. मात्र अमेरिकेने इराणी बंदरांभोवती आणि होर्मुज परिसरात नौदलाची नाकेबंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याने पुन्हा तणाव वाढला आहे.
होर्मुज सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाची तेल वाहतूक मार्गांपैकी एक मानली जाते. दररोज कोट्यवधी बॅरल कच्चे तेल या मार्गातून जाते. त्यामुळे येथे पुन्हा नाकेबंदी लागू झाल्यास जागतिक तेलबाजारात मोठी अस्थिरता निर्माण होऊ शकते. आधीच युद्ध आणि तणावामुळे वाढलेल्या इंधन दरांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.