उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळासंदर्भात वादग्रस्त विधान केले होते. सर्वच पक्ष संजय राऊतांविरोधात आक्रमक झाले होते. संजय राऊतांविरोधात सत्ताधाऱ्यांकडून आंदोलन करण्यात आले. तसेच, संजय राऊतांना अटक करा, अशी शिवसेनेकडून मागणीही करण्यात आली.
भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंगाची मागणी करणारे पत्र दिले. या पत्राला सर्वपक्षीय संमती मिळाली आहे.
खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर दोन दिवसांत चौकशी करणार असून, हक्कभंग प्रकरणावर ८ मार्चला निर्णय देण्यात येणार आहे, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले आहे.
बुधवारी, १ मार्च २०२३ रोजी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसाचे कामकाज सुरु झाले. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी संजय राऊत यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे विधिमंडळात गदारोळ माजला. संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना ४० चोर म्हणत विधिमंडळाचा चोरमंडळ असा उल्लेख केला होता. संजय राऊत यांनी विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केल्यामुळे त्यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव करण्यात आला होता. यामुळे, सर्वच पक्ष संजय राऊतांविरोधात एकवटले होते.