IndiGo च्या मोठ्या प्रमाणातील फ्लाइट कॅन्सलेशनमुळे गेल्या काही दिवसांपासून देशभरात गोंधळाचे वातावरण होते. दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि चेन्नईसारख्या प्रमुख विमानतळांवर प्रवाशांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र आता कंपनीने परिस्थिती सुधारत असल्याचे सांगितले आहे. शनिवारी 850 पेक्षा जास्त फ्लाइट्स रद्द झाल्या असल्या तरी, रविवारी (7 डिसेंबर)पासून ऑपरेशन्स पुन्हा सुरळीत करण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.
IndiGo ने जाहीर केले की आज दिवसभरात 1500 पेक्षा जास्त उड्डाणे सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. कंपनीच्या मते, त्यांच्या 138 गंतव्यस्थानांपैकी 135 ठिकाणांचे कनेक्शन पुन्हा सुरू करण्यात आले आहे. नेटवर्क, सिस्टिम आणि क्रू रोस्टर स्थिर करण्यावर सर्व टीम्स काम करत आहेत, जेणेकरून पुढील काही दिवसांत सेवा पूर्ण क्षमतेने सुरू राहील. मागील काही दिवसांतील मोठ्या अडथळ्यांमागे FDTL (Flight Duty Time Limitations) या नवीन नियमांची अंमलबजावणी आणि तांत्रिक तयारीतील त्रुटी कारणीभूत ठरल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. पायलट आणि क्रू मेंबर्सच्या ड्युटी आणि विश्रांतीचे वेळापत्रक नीट जुळवता न आल्याने अनेक फ्लाइट्समध्ये बिघाड झाला.
मात्र DGCA (Directorate General of Civil Aviation) ला वाटते की या बदलांसाठी योग्य नियोजन केले गेले नाही. DGCA ने IndiGo चे CEO Peter Elbers आणि accountable manager Isidro Porquera यांना कारणे दाखवा (show-cause notice) जारी करून 24 तासांत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. प्रवाशांच्या तक्रारी वाढत असल्याने आणि काही मार्गांवर भाडे वाढल्याने DGCA ने एअरलाईनना 'fair and reasonable' भाडे ठेवण्याचे निर्देशही दिले आहेत. प्रवाशांना अडचण होऊ नये म्हणून नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने 7 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजेपर्यंत सर्व प्रलंबित रिफंड प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
IndiGo ने सुद्धा जाहीर केले आहे की 05 डिसेंबर 2025 ते 15 डिसेंबर 2025 या कालावधीतील प्रवासासाठी कॅन्सलेशन किंवा बदल करण्यावर full fee waiver दिला जाईल. फ्लाइट स्टेटस, रिफंड किंवा रीबुकिंगसाठी आवश्यक माहिती प्रवाशांना IndiGo च्या 6Eskai AI assistant किंवा goIndiGo.in/6Eskai वर मिळेल. प्रवाशांना अपडेट देण्यासाठी कंपनीने या सेवांना अधिक सक्रिय केले आहे.
IndiGo ने ग्राहक, कर्मचारी आणि सरकारी संस्थांचे आभार मानत म्हटले की, “आम्ही परिस्थिती सुधारण्यात जलद प्रगती करत आहोत आणि प्रवाशांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू.” तज्ञांच्या मते, काही दिवसांतच 95 टक्के कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू करणे हे एअरलाईनसाठी सकारात्मक पाऊल आहे. मात्र प्रवाशांना वेळेवर रिफंड, योग्य माहिती आणि सेवा देणे हेच आता कंपनीसाठी सर्वात मोठे आव्हान असेल. पुढील काही दिवसांत DGCA च्या निर्णयांकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.