मुंबई: भारतीय शेअर बाजारातील (Indian Stock Market) घसरणीचा सिलसिला अद्यापही थांबलेला दिसत नाही. आठवड्याच्या चौथ्या व्यवहार दिवशी गुरुवारीही बाजाराची सुरुवात सुस्त आणि नकारात्मक वातावरणात झाली. जागतिक बाजारांमधील (Global Markets) कमजोर संकेतांचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावर स्पष्टपणे जाणवत आहे. गुरुवारी बीएसईचा (BSE) 30 शेअर्सचा सेन्सेक्स (Sensex) 41 अंकांनी घसरत 84,518 या पातळीवर उघडला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (NSE) निफ्टी 50 (Nifty 50) 53 अंकांनी घसरून 25,765 वर व्यवहाराची सुरुवात करताना दिसला. याआधीही बाजारात सलग तीन सत्रांपासून घसरणीचा कल कायम आहे.
गिफ्ट निफ्टी (Gift Nifty) वरील ट्रेंड्स पाहता बाजारात सपाट मात्र घसरणीसह सुरुवात होण्याचे संकेत मिळाले होते. गिफ्ट निफ्टी 25,871 च्या आसपास व्यवहार करत असून तो मागील निफ्टी फ्युचर्स क्लोजिंगच्या तुलनेत 15 अंकांनी किंवा 0.06 टक्क्यांनी घसरलेला होता. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरीचे वातावरण कायम आहे.
बुधवारीही भारतीय इक्विटी बाजारात (Indian Equity Market) विक्रीचा दबाव कायम राहिला. सेन्सेक्स 120.21 अंकांनी म्हणजेच 0.14 टक्क्यांनी घसरून 84,559.65 वर बंद झाला. तर निफ्टी 41.55 अंकांनी किंवा 0.16 टक्क्यांनी घसरून 25,818.55 वर बंद झाला होता.
बाजारातील या सततच्या घसरणीमागे रुपयातील कमजोरी (Rupee Weakness), परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली भांडवल आऊटफ्लो (Foreign Capital Outflow) आणि भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत (India-US Trade Deal) होत असलेला विलंब ही प्रमुख कारणे मानली जात आहेत. या घटकांमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास काहीसा डळमळीत झाला आहे.
आगामी सत्रांमध्ये जागतिक संकेत, चलन बाजारातील हालचाली आणि परदेशी गुंतवणूकदारांची भूमिका यावर शेअर बाजाराची दिशा अवलंबून राहणार आहे. त्यामुळे सध्या गुंतवणूकदारांकडून प्रतीक्षा आणि सावध भूमिका घेतली जात असल्याचे चित्र दिसत आहे.
हेही वाचा: Bharat Taxi चा चालकांना फायदा, Ola-Uber प्रमाणे कमिशन द्यावे लागणार नाही आणि…