नवी दिल्ली: देशसेवेची आवड असणाऱ्या आणि भारतीय लष्करात (Indian Army) करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय सैन्याने सिव्हिलियन पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे 'सिव्हिलियन स्वीच बोर्ड ऑपरेटर' (Civilian Switch Board Operator, CSBO) ग्रेड-II ची एकूण 190 पदे भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे, पणजी (गोवा) येथील इंडियन आर्मी हेडक्वार्टर-2 सिग्नल ट्रेनिंग सेंटरमार्फत ही भरती राबवली जात असून, यासाठी देशभरातील पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.
अर्जासाठी ई-मेलचा वापर आणि महत्त्वाच्या तारखा
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 2 मे 2026 पासून सुरू झाली असून, इच्छुकांना 31 मे 2026 पर्यंत आपले अर्ज सादर करता येणार आहेत. या भरतीचे वैशिष्ट्य म्हणजे उमेदवारांना कोठेही कागदपत्रे पोस्टाने न पाठवता केवळ ई-मेलच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करायचा आहे. यासाठी सर्वप्रथम www.indianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळावरून अर्जाचा नमुना (PDF) डाऊनलोड करून तो अचूक भरावा लागेल.
अशी आहे पदसंख्या आणि आरक्षणाची स्थिती
एकूण 190 पदांपैकी विविध प्रवर्गांसाठी जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये अनारक्षित (Open) गटासाठी 94 जागा, अनुसूचित जातीसाठी 22, अनुसूचित जमातीसाठी 12, तर ओबीसी (OBC) प्रवर्गासाठी 43 जागांचा समावेश आहे. याशिवाय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) 19, दिव्यांगांसाठी 12 आणि माजी सैनिकांसाठी 20 पदे राखीव ठेवण्यात आली आहेत.
पात्रतेचे निकष आणि आवश्यक अनुभव
CSBO पदांसाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार किमान माध्यमिक परीक्षा (दहावी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेसोबतच, उमेदवाराकडे 'पीबीएक्स' (PBX) म्हणजेच टेलिफोन स्वीच बोर्ड हाताळण्याचा किमान 6 महिन्यांचा कामाचा अनुभव असणे अनिवार्य आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आपल्याकडे सर्व आवश्यक अनुभव प्रमाणपत्रे आणि शैक्षणिक कागदपत्रे असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
निवड प्रक्रिया आणि परीक्षेचे स्वरूप
उमेदवारांची अंतिम निवड ही 100 गुणांच्या लेखी परीक्षेवर आधारित असेल. या परीक्षेत सामान्य बुद्धिमत्ता, अंकगणित, सामान्य ज्ञान, इंग्रजी आणि रिझनिंग अशा विषयांवर प्रश्न विचारले जातील. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना पुढील टप्प्यात प्रॅक्टिकल टेस्ट आणि मुलाखतीसाठी बोलावले जाईल. जरी या चाचण्या महत्त्वाच्या असल्या तरी त्या केवळ पात्रता स्वरूपाच्या (Qualifying Nature) असतील. अंतिम गुणवत्ता यादी ही केवळ लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारेच तयार केली जाणार आहे.
अर्ज करण्याची नेमकी पद्धत
इच्छुक उमेदवारांनी पूर्णपणे भरलेला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांच्या (आधार कार्ड, दहावीचे प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र) स्कॅन कॉपी sunshine.rise@nic.in या ई-मेल आयडीवर पाठवायच्या आहेत. ई-मेल पाठवताना विषयाच्या रकान्यात (Subject Line) 'CSBO Application' असे लिहून आपले नाव नमूद करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अर्धवट भरलेले किंवा अंतिम तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज फेटाळले जातील, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटवरील नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे.