भारत आणि अमेरिकेतील तणाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेने भारतावर आयात शुल्क वाढवल्यानंतर आणि H1-B व्हिसाच्या शुल्कात मोठी वाढ झाल्यानंतर आता डिजिटल क्षेत्रातही ‘स्वदेशी बनाम विदेशी’ ही चर्चा रंगू लागली आहे. अनेकजण अमेरिकन ॲप्सऐवजी भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करण्याची तयारी दाखवत आहेत.
या बदलत्या परिस्थितीत भारतीय कंपन्यांनी विकसित केलेले अनेक डिजिटल पर्याय पुढे येत आहेत. उदाहरणार्थ, Zoho Corporation ने "Arattai" नावाचे ॲप WhatsApp चा पर्याय म्हणून बाजारात आणले आहे. यात एंड-टू-एंड एन्क्रिप्शन, ग्रुप चॅट, मल्टिमीडिया शेअरिंग यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. आत्मनिर्भर भारताच्या ध्येयाला साजेसा हा प्रयत्न असून त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय.
नेव्हिगेशनसाठी Google Maps चा भारतीय पर्याय म्हणजे MapmyIndia चे Mappls. या ॲपमध्ये शहरांसह ग्रामीण भागातील रस्त्यांची माहिती, सध्याचा ट्रॅफिक डेटा आणि स्थानिक तपशील सहज मिळतो. त्यामुळे नकाशे आणि दिशादर्शनासाठी हे ॲप भारतीय वापरकर्त्यांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.
ऑफिस टूल्समध्येही Zoho ने दमदार पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. Microsoft Word च्या जागी Zoho Writer, Excel ऐवजी Zoho Sheet आणि PowerPoint ऐवजी Zoho Show वापरता येऊ शकते. ही साधने क्लाउड-आधारित असून एडिटिंग, चार्टिंग, टेम्पलेट्स आणि प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी उत्तम पर्याय मानली जात आहेत.
ई-मेलसाठी Gmail च्या तुलनेत Zoho Mail हा सोपा आणि कार्यक्षम पर्याय आहे. तसेच दस्तऐवजांच्या डिजिटल सहीसाठी Adobe Sign च्या ऐवजी Zoho Sign वापरता येतो. ई-कॉमर्स क्षेत्रातही Flipkart हा Amazon ला मजबूत पर्याय ठरत आहे.
एकूणच पाहता, जागतिक तणावामुळे भारतीय डिजिटल प्लॅटफॉर्मना प्रोत्साहन मिळत आहे. सरकारच्या ‘स्वदेशी’ हाकेला प्रतिसाद देत लोक आता देशी ॲप्स आणि सेवांकडे वळत आहेत. येत्या काळात हे पर्याय खऱ्या अर्थाने अमेरिकन ॲप्सला टक्कर देतात का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.