T20 World Cup: भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचे सावट; सामना रद्द झाला तर कोणाचा फायदा आणि कोणाचे नुकसान?

कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणाऱ्या भारत-पाकिस्तान टी20 सामन्यावर पावसाचे सावट आहे

T20 World Cup: भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचे सावट; सामना रद्द झाला तर कोणाचा  फायदा आणि कोणाचे नुकसान?

कोलंबो: क्रिकेटच्या मैदानात जेव्हा भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येतात, तेव्हा तो केवळ एक खेळ उरत नाही, तर ती कोट्यवधी चाहत्यांच्या भावनांची लढाई असते. येत्या रविवारी, 15 फेब्रुवारीला कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर T20 वर्ल्ड कपचा थरार रंगणार आहे. मात्र, चाहत्यांच्या या प्रचंड उत्साहावर आणि कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील 'काटे की टक्कर' पाहण्याच्या प्रतिक्षेवर वरुणराजा पाणी फेरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या सामन्याभोवती असलेले वादाचे वलय आणि पावसाची शक्यता यामुळे सामना होण्याआधीच चर्चेचा विषय बनला आहे.

या सामन्याची पार्श्वभूमी आधीच वादाच्या ठिणगीने पेटलेली आहे. पाकिस्तानने सुरुवातीला या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा 'बाउन्सर' टाकला होता, परंतु ICCसोबतच्या बैठकीनंतर त्यांनी 'यु-टर्न' घेत मैदानात उतरण्यास सहमती दर्शवली. त्यातच, 2025 च्या आशिया कप फायनलमधील दोन्ही संघांच्या खेळाडूंनी परस्परांशी 'हस्तांदोलन टाळण्या'च्या प्रकरणामुळे तणाव शिगेला पोहोचला आहे. त्यामुळे, मैदानावर चेंडू पडण्याआधीच दोन्ही गोटात कमालीची गरमागरमी आहे. मात्र, आता ही आक्रमकता पावसाच्या सरींनी शांत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

श्रीलंकेच्या हवामान खात्याने दिलेल्या इशारानुसार, रविवारी दक्षिण-पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. जरी अधिकृत सरकारी निवेदनात थेट पावसाचा उल्लेख टाळला असला तरी, जागतिक हवामान संकेतस्थळांच्या माहितीनुसार रविवारी संध्याकाळी 6, 7 आणि 8 वाजता कोलंबोमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग होऊ शकते. जर हा अंदाज तंतोतंत खरा ठरला, तर सामना रद्द करावा लागू शकतो, ज्यामुळे चाहत्यांचा हिरमोड होणे निश्चित आहे.

हेही वाचा: Pulwama Attack: पुलवामा दहशतवादी हल्ल्याला सात वर्षे पूर्ण, 40 सीआरपीएफ शहीद जवानांचे बलिदान आजही देशाच्या मनात जिवंत

सामना रद्द झाला तर नक्की कोणाचे नशीब उजळणार?

गणिताच्या भाषेत सांगायचे तर, सामना रद्द झाल्यास भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. सद्यस्थितीत 'ग्रुप ए' मध्ये दोन्ही संघांकडे प्रत्येकी चार गुण आहेत. त्यामुळे एका गुणाच्या मदतीने त्यांची गुणसंख्या पाच वर पोहोचेल आणि हे दोन्ही संघ 'सुपर-8' फेरीसाठी सहज पात्र ठरतील. थोडक्यात, पाऊस पडला तर तो भारत आणि पाकिस्तानसाठी फायदेशीरच ठरू शकतो.

दुसरीकडे, या पावसाचा फटका मात्र अमेरिका (USA) आणि नेदरलँड्स या संघांना बसू शकतो. दोन्ही संघांकडे सध्या प्रत्येकी दोन गुण असून त्यांचा आता केवळ एकच सामना शिल्लक आहे. जर भारत-पाकिस्तान सामना रद्द होऊन दोन्ही मोठे संघ पाच गुणांवर पोहोचले, तर अमेरिका आणि नेदरलँड्सने उरलेले सामने जिंकले तरीही त्यांचे जास्तीत जास्त चार गुण होतील. हे गुण त्यांना सुपर-8 मध्ये पोहोचवण्यासाठी अपुरे ठरतील. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा सुपर-8 मध्ये धडक मारण्याचे अमेरिकेचे स्वप्न कोलंबोच्या पावसात वाहून जाऊ शकते.

अमेरिकेच्या आशा आता पूर्णपणे 'जर-तर'च्या समीकरणावर अवलंबून आहेत. जर 15 तारखेला पाऊस पडला नाही आणि टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारली, तसेच नामिबियाने पाकिस्तानला धक्का दिला आणि अमेरिकेने नामिबियावर विजय मिळवला, तरच अमेरिकेला पुढच्या फेरीचे तिकीट मिळू शकते. त्यामुळे रविवारची संध्याकाळ केवळ भारत-पाकिस्तान चाहत्यांसाठीच नाही, तर अमेरिकन संघासाठीही अत्यंत निर्णायक ठरणार आहे.

हेही वाचा: DGCA New Rules: वैमानिकांसाठी 12 तासांचा नवा नियम काय आहे? दारू पिऊन विमान उडवणाऱ्यांना आता थेट जेल की निलंबन?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number