नवी दिल्ली: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे जगभरातून पाकिस्तानवर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर, भारताने संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत पाकिस्तानला कठोर शब्दांत सुनावले आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या प्रतिनिधी योजना पटेल यांनी व्हिक्टिम्स ऑफ टेररिझम असोसिएशन नेटवर्क (VoTAN) या संयुक्त राष्ट्राच्या उपक्रमासंदर्भात झालेल्या बैठकीत पाकिस्तानला फटकारले आणि म्हणाले, ‘एका देशाच्या शिष्टमंडळाने या व्यासपीठाचा गैरवापर करून भारताविरोधात निराधार आरोप करून अपप्रचार करणे दुर्दैवी आहे.’
यावेळी, योजना पटेल यांनी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या नुकत्याच केलेल्या जाहीर विधानाचा संदर्भ देत पाकिस्तानला खडेबोल सुनावले. त्यांनी म्हणाले, ‘पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी “दहशतवादी संघटनांना पाठिंबा देण्याचा, प्रशिक्षण देण्याचा आणि दहशतवादी कारवायांना आर्थिक पाठबळ देण्याचा पाकिस्तानचा इतिहास आहे” असे जाहीरपणे मान्य केले आहे. ख्वाजा आसिफ यांची ही कबुली ऐकून कोणालाही आश्चर्य वाटले नाही. यातून पाकिस्तान जागतिक दहशतवादाला खतपाणी घालणारा आणि भारतीय उपखंडात अस्थैर्य निर्माण करणारा देश सिद्ध झाला आहे. आता जग याकडे दुर्लक्ष करू शकत नाही’.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताला पाठिंबा देणाऱ्या देशांचे आभार योजना पटेल यांनी मानले. ‘आंतरराष्ट्रीय समुदायाची दहशतवादाविरुद्ध कठोर भूमिका यातून स्पष्ट होते. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामध्ये 26/11 च्या मुंबई हल्ल्यानंतर सर्वाधिक सामान्य नागरिकांचा बळी गेला आहे. गेल्या अनेक दशकांपासून भारत सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांचा बळी ठरला आहे. अशा कारवायांनंतर मृतांच्या कुटुंबीयांवर आणि समाजावर होणाऱ्या दूरगामी परिणामांची भारताला पूर्ण कल्पना आहे’, असेही योजना पटेल यांनी नमूद केले.
‘संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या निवेदनानुसार, दहशतवादी कारवायांचे नियोजन करणारे, त्यांना आर्थिक मदत करणारे आणि कर्ताधर्ते दोषी मानून त्यांना शासन व्हावे. दहशतवादी कृत्ये गुन्हेगारी स्वरूपाची आणि असमर्थनीय असतात. त्यांचा उद्देश काहीही असो, ती कधीही, कुठेही आणि कोणीही केली असो’, असे योजना पटेल यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तानचा इतिहास:
‘पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी ”दहशतवादी संघटनांना पाठिंबा देण्याचा, प्रशिक्षण देण्याचा आणि दहशतवादी कारवायांना आर्थिक पाठबळ देण्याचा पाकिस्तानचा इतिहास आहे” असे एका जाहीर मुलाखतीत मान्य केले आहे. ख्वाजा आसिफ यांची ही जाहीर कबुली ऐकून कोणालाही आश्चर्य वाटले नाही. यातून पाकिस्तान जागतिक दहशतवादाला खतपाणी घालणारा आणि भारतीय उपखंडात अस्थैर्य निर्माण करणारा देश सिद्ध झाला आहे’, असे योजना पटेल म्हणाले.
#IndiaAtUN Amb. DPR @PatelYojna delivered India’s statement at the launch of the Victims of Terrorism Association Network. (1/2) @MEAIndia @UN pic.twitter.com/1fd7arhjXy — India at UN, NY (@IndiaUNNewYork) April 28, 2025