Nirmala Sitharaman: निर्मला सीतारामन यांचा खुलासा! इंधन दर स्थिर राहणार, नागरिकांना दिलासा

जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात पेट्रोल डिझेल आणि एटीएफ दर वाढणार नसल्याचे केंद्राने स्पष्ट केले असून पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आश्वासन देत लॉकडाऊनच्या अफवांनाही फेटाळले आहे

Nirmala Sitharaman: निर्मला सीतारामन यांचा खुलासा! इंधन दर स्थिर राहणार, नागरिकांना दिलासा

पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशातील इंधन दर आणि पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या चिंतेवर केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं की, पेट्रोल, डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) यांच्या दरात वाढ होऊ नये यासाठी सरकार सक्रियपणे पावले उचलत आहे.दिल्लीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, जागतिक परिस्थितीचा परिणाम भारतावर होऊ नये यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत इंधनाचा पुरवठा सुरळीत ठेवण्याबरोबरच दर नियंत्रणात ठेवण्यावर भर देण्यात आला. सामान्य नागरिकांना महागाईचा फटका बसू नये, हा सरकारचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.यासाठी केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली आहे. तसेच, तेल विपणन कंपन्यांना आर्थिक पाठबळ देण्याचा निर्णय घेतला असून, त्यांना आयातीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे देशात इंधनाचा तुटवडा निर्माण होणार नाही, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.

परदेशातून कच्चे तेल आणून त्यावर प्रक्रिया करून निर्यात करणाऱ्या रिफायनरींवर अधिक शुल्क लावण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. यामागचा उद्देश देशांतर्गत बाजारात इंधन उपलब्धता वाढवणे हा आहे.देशात लॉकडाऊन लागू होण्याच्या अफवांवरही अर्थमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. सध्या अशी कोणतीही परिस्थिती नसून लॉकडाऊन लागू करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांत राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवरही भारतात इंधन दर आणि पुरवठा स्थिर ठेवण्यासाठी सरकारकडून ठोस उपाययोजना सुरू असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number