कोणताही व्हायरस नाही, तरी कोरोनासारखीच आपत्ती! देशात ‘सेल्फ लॉकडाऊन’ची वेळ, प्रशासन अलर्ट मोडवर

देशात उष्णतेचा कहर वाढला असून अनेक राज्यांत तापमान 45 अंशांच्या पुढे गेले आहे.

कोणताही व्हायरस नाही, तरी कोरोनासारखीच आपत्ती! देशात ‘सेल्फ लॉकडाऊन’ची वेळ, प्रशासन अलर्ट मोडवर

Heatwave: कोरोनाच्या काळातील ओस पडलेले रस्ते, घराबाहेर पडण्याची भीती आणि प्रशासनाचे निर्बंध  हे सगळं चित्र पुन्हा एकदा देशात पाहायला मिळत आहे. मात्र यावेळी कारण कोणताही व्हायरस नसून, प्रचंड वाढलेली उष्णता आहे. देशातील अनेक भागांत तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलं असून, नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने घरात राहणं पसंत केलं आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ‘सेल्फ लॉकडाऊन’सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

5 राज्य उष्णतेच्या कचाट्यात

उत्तर भारतासह मध्य भारतातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट तीव्र झाली आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये 45.2°C, तर महाराष्ट्रातील अकोल्यात 45°C तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर यांसारखी शहरे अक्षरशः भाजून निघत आहेत. दुपारच्या वेळी रस्ते सुनसान दिसत असून, नागरिक बाहेर पडणं टाळत आहेत.

60 जिल्ह्यांत रेड अलर्ट

हवामान विभागाने उत्तर प्रदेशातील तब्बल 60 जिल्ह्यांमध्ये ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. विशेष म्हणजे, उष्णतेचा प्रभाव आता फक्त दिवसापुरता मर्यादित राहिलेला नाही. रात्रीसुद्धा तापमान कमी न होता ‘वॉर्म नाईट’चा अनुभव येत आहे. दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये रात्रीही उकाडा असह्य होत असल्याने नागरिकांना आराम मिळत नाही.

कर्नाटकात ‘हीट स्ट्रोक युनिट्स’ सुरू

उष्णतेच्या वाढत्या धोक्याचा विचार करून कर्नाटक सरकारने राज्यातील रुग्णालयांमध्ये विशेष ‘हीट स्ट्रोक युनिट्स’ सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. यावरून परिस्थिती किती गंभीर आहे, याची कल्पना येते. उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शाळा बंद, कामांवर निर्बंध

ओडिशामध्ये तापमान 40 अंशांपेक्षा अधिक गेल्यामुळे अनेक शहरांतील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच उत्तर प्रदेशातील आग्रा, मथुरा यांसारख्या जिल्ह्यांत दुपारी 12 ते 4 या वेळेत मजुरांच्या कामावर बंदी घालण्यात आली आहे. या उपाययोजनांमुळे नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

केरळमध्ये ‘सेल्फ लॉकडाऊन’चे आवाहन

केरळमध्येही उष्णतेचा तडाखा जाणवत असून, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. याला ‘सेल्फ लॉकडाऊन’ असं संबोधलं जात असून, लोकांनीही त्याला प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती?

महाराष्ट्रात विशेषतः विदर्भ भाग सर्वाधिक उष्णतेच्या झळा सहन करत आहे. अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळ ही शहरे देशातील सर्वाधिक तापमान असलेल्या शहरांच्या यादीत आहेत. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना दुपारी 11 ते 4 या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे.

देशातील सर्वाधिक तापमान असलेली शहरे

प्रयागराज (45.2°C), अकोला (45°C), झारसुगुडा (44.8°C), अमरावती (44.8°C), वर्धा (44.4°C), वाराणसी (44.3°C), रोहतक (44.3°C) अशी अनेक शहरे उष्णतेच्या उच्चांकावर पोहोचली आहेत.

पुढील 48 तासांचा अंदाज

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसांत उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात हीटवेव्ह कायम राहणार आहे. 27 एप्रिलला बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत उष्णतेची लाट अधिक तीव्र होईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number