INDIA Alliance Meeting: दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीची रणनीती निश्चित; केंद्र सरकारला घेरण्यासाठी विरोधकांचे 5 मोठे निर्णय

आगामी काळात केंद्र सरकारला संसदेत आणि संसदेबाहेर कोंडीत पकडण्यासाठी या बैठकीत सर्वपक्षीय रणनीती आखण्यात आली.

INDIA Alliance Meeting: दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीची रणनीती निश्चित; केंद्र सरकारला घेरण्यासाठी विरोधकांचे 5 मोठे निर्णय

INDIA Alliance Meeting: देशाच्या राजधानीत दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे विरोधी पक्षांच्या 'इंडिया' (INDIA) आघाडीची एक अत्यंत महत्त्वाची आणि धोरणात्मक बैठक पार पडली. आगामी काळात केंद्र सरकारला संसदेत आणि संसदेबाहेर कोंडीत पकडण्यासाठी या बैठकीत सर्वपक्षीय रणनीती आखण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षासह एकूण 25 राजकीय पक्षांनी या विचारमंथनात सहभाग घेतला. मात्र, या बैठकीपासून आम आदमी पक्ष (AAP) आणि डीएमके (DMK) या दोन मोठ्या पक्षांनी अंतर राखल्याचे दिसून आले. बैठक संपल्यानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आघाडीने घेतलेल्या 5 महत्त्वाच्या करारांची घोषणा केली.

नियमित बैठकांचा फॉर्म्युला; पुढील मुक्काम हैदराबाद येथे
'इंडिया' आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी यापुढे केवळ निवडणुकांपुरते मर्यादित न राहता सातत्याने संपर्कात राहण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, दर 2 महिन्यांनी आघाडीच्या नेत्यांची नियमित बैठक घेण्यावर सर्व पक्षांचे एकमत झाले आहे. या मालिकेतील पुढची महत्त्वाची बैठक ऑगस्ट महिन्यामध्ये हैदराबाद येथे आयोजित करण्यात येणार असल्याचे खर्गे यांनी स्पष्ट केले.

निवडणूक गैरप्रकारांविरोधात सरन्यायाधीशांकडे धाव
देशातील लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत 'इंडिया' आघाडीने कायदेशीर आणि घटनात्मक पाऊल उचलण्याचे ठरवले आहे. निवडणुकीतील कथित मतचोरी आणि मतमोजणीतील गैरप्रकारांच्या गंभीर मुद्द्यांवर प्रकाश टाकणारे एक सविस्तर पत्र भारताच्या सरन्यायाधीशांना (CJI) पाठवले जाणार आहे. हे पत्र लवकरच आघाडीच्या शिष्टमंडळातर्फे सरन्यायाधीशांना प्रत्यक्ष सादर केले जाईल.

'नीट' पेपर लीकवरून शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
सध्या देशात गाजत असलेल्या शिक्षण क्षेत्रातील घोटाळ्यांवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. NEET आणि CBSE परीक्षांमधील अनियमिततेमुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ झाला असून, त्यांची फसवणूक झाल्याचा आरोप आघाडीने केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी एकमुखी मागणी या बैठकीत करण्यात आली.

देशातील ज्वलंत प्रश्नांवर सर्वपक्षीय बैठकीचा आग्रह
आघाडीने देशातील ढासळती आर्थिक परिस्थिती आणि जनतेच्या थेट जिव्हाळ्याच्या प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरले आहे. बेरोजगारीचा वाढता आलेख, कंबरतोड महागाई आणि देशभरातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने विनाविलंब एक विशेष सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी 'इंडिया' आघाडीने लावून धरली आहे.

हेही वाचा – TMC Split: तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट; ममता बॅनर्जी दिल्लीत असतानाच 20 लोकसभा खासदारांचे बंड, NDA ला पाठिंबा देण्याची घोषणा

पावसाळी अधिवेशनात रोज सकाळी होणार 'ॲक्शन प्लॅन'
संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनादरम्यान सत्ताधाऱ्यांचा मुकाबला करण्यासाठी विरोधकांनी अंतर्गत समन्वय अधिक मजबूत केला आहे. दर 2 महिन्यांच्या मोठ्या बैठकांव्यतिरिक्त, अधिवेशन सुरू असताना दररोज सकाळी विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात सर्व घटक पक्षांची एक समन्वय बैठक होईल. यामध्ये त्या दिवसाच्या संसदीय कामकाजाचा आणि आंदोलनाचा 'ॲक्शन प्लॅन' रोज सकाळी निश्चित केला जाईल. या संपूर्ण रणनीतीला उद्धव ठाकरे आणि हेमंत सोरेन यांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडले जात आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number