विधान परिषद निवडणुकीदरम्यान नाशिक विधान परिषदेत सुरुवातीपासूनच मोठा सस्पेन्स पाहायला मिळाला होता. अशातच आज राज्यातील 17 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत 6 जागांवर बिनविरोध निवडणूक झाल्यामुळं उरलेल्या 11 ठिकाणांचे निकाल आज जाहीर होत असताना, नाशिक विधान परिषदेत मतमोजणी दरम्यान धक्कादायक निकाल लागला आहे. गोकुळ गीतेंच्या आघाडीने नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतील गणिते बदलली आहेत.
नाशिक विधान परिषदेच्या रिंगणात अपक्ष उतरलेले भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी पहिल्याच फेरीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला भुईसपाट केलं आहे. गोकुळ गीतेंनी पहिल्या फेरीत 310 पैकी 389 मतांनी निर्णायक आघाडी घेतली. पहिल्याच फेरीत मिळालेल्या या एकतर्फी मतदानामुळे महायुती आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बॅकफूटवर गेले आहेत. त्यामुळे अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा विजय झाला असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांचा पराभव झाला आहे. नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.
गोकुळ गीतेंचा खळबळजनक दावा
काही वेळापूर्वीच गोकुळ गीते यांनी “मी फक्त प्रचार थांबवला होता, माघार घेतली नव्हती. मतदारांचा मला उत्स्फूर्त पाठिंबा आहे. गुप्त पद्धतीने माझा प्रचार झाला त्यामुळे माझं विजय निश्चित आहे.” असा खळबळजनक दावा केला होता. मतमोजणीच्या पहिल्या फेरीचे आकडे समोर आल्यानंतर त्यांचा हा दावा तंतोतंत खरा ठरताना दिसत आहे. गोकुळ गीते यांच्या दाव्यामुळे शेवटच्या दिवशी देखील ट्विस्ट कायम राहिलेला पाहायला मिळत होते. या धक्कादायक आकड्यांमुळे महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणावर मतफुटी किंवा क्रॉस व्होटिंग झाल्याची चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे.
नाशिक मतमोजणी केंद्रावर गोंधळ
नाशिक मतमोजणी केंद्रावर गोंधळ देखील झाल्याचे पाहायला मिळाले होते. गोकुळ गीते आणि नरेंद्र दराडे यांचे समर्थक एकमेकांना मतमोजणी केंद्रात भिडले असून मतमोजणी सुरू असताना मोठा गोंधळ निर्माण झाला. किशोर दराडे विद्यमान आमदार असल्याने त्यांनी बाहेर जावे असा गोकुळ गीते यांनी आक्षेप घेतला होता. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे बंधू शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या उपस्थितीला गीते यांनी आक्षेप घेतला होता. यावरूनच मतदान केंद्रात मतमोजणीच्या ठिकाणी दोघांमध्ये गोंधळ झाला. दरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर झालेल्या सुनावणीत गोकुळ गीते यांच्या आक्षेपाचं निरसन करण्यात आलं.