कणकवलीत अवैध वाळू उपसा; माजी आमदार वैभव नाईकांचा महसूल विभागावर गंभीर आरोप

कणकवलीत कासार्डे गावात बेकायदा वाळू-सिलीका उत्खनन; महसूल अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांचा. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.

कणकवलीत अवैध वाळू उपसा; माजी आमदार वैभव नाईकांचा महसूल विभागावर गंभीर आरोप

सिंधुदुर्ग: कणकवली तालुक्यातील कासार्डे गावात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू आणि सिलीका उत्खनन सुरू असून, यामागे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचा थेट सहभाग आहे, असा गंभीर आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. गावातील 2 ते 2.5 हजार हेक्टर परिसरात बेकायदा उत्खनन सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली असून, स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत तक्रारी केल्या तरी कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे ते म्हणाले.

वैभव नाईक म्हणाले की, ज्यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली, त्यांच्याकडून तो दंड आजतागायत शासनाने वसूल केलेला नाही. उलटपक्षी, त्यांनाच पुन्हा उत्खनन करण्यास प्रोत्साहित केलं जातं आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामागे कोण 'आका' आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. महसूल अधिकाऱ्यांना करोडो रुपयांचे हप्ते दिले जात असल्यामुळे ते या भागात जाऊन पाहणीही करत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.

नाईक यांनी हेही स्पष्ट केलं की, त्यांनी सर्व पुरावे जिल्हाधिकारी आणि महसूल अधिकाऱ्यांना सादर करण्याचा निर्णय घेतला असून, जर यावर लवकरात लवकर कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. याप्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचेही लक्ष वेधण्यात येणार असून, ते लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.

हेही वाचा:'सरकारने हवेत स्वप्नं दाखवली पण…..' रोहित पवारांचा हल्लाबोल

राजकीय टीका: शिरसाट आणि अजित पवार यांच्यावर निशाणा

राजकीय पातळीवरही वैभव नाईक यांनी जोरदार हल्लाबोल केला. संजय शिरसाट यांच्यावर टीका करताना त्यांनी म्हटलं की, स्वतःच्या मंत्र्यांनीच त्यांना सांगितलं की, सत्तेत राहा नाहीतर बाहेर पडा. त्यांना ना खात्याचा अभिमान आहे, ना समाजाविषयी कळवळा. जर शिरसाट यांच्यात खरा स्वाभिमान असेल, तर त्यांनी आपल्या समाजाला न्याय मिळवून न दिल्याबद्दल राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही निशाणा साधत नाईक म्हणाले की, जर शरद पवार नसते, तर अजित पवार आज उपमुख्यमंत्री देखील झाले नसते. त्यांनी त्यांच्या चुलत्याची गद्दारी करून हे पद मिळवलं. राज्यातील विविध खात्यांवर अजित पवार मनमानी करत असून, त्यामुळे बांधकाम, सामाजिक न्याय विभाग यांच्यावर अन्याय होत असल्याचे त्यांनी सांगितले.

योजना आणि निवडणुका:सरकारवर अविश्वास

नाईक यांनी सरकारवर योजनांच्या अंमलबजावणीबाबतही गंभीर आरोप केले. शेतकऱ्यांची कर्जमाफी, भोजन थाळी, अशा अनेक योजना बंद करण्यात आल्या आहेत. निवडणुकीत जनतेला आकर्षित करण्यासाठी योजना आणल्या जातात आणि निवडणुका संपताच त्या बंद केल्या जातात, अशी टीका त्यांनी केली.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत ते म्हणाले की, सरकारला माहित आहे की जनाधार कमी आहे, म्हणून अजूनही सहा महिन्यांत निवडणुका होतील की नाही, सांगता येणार नाही.

उदय सामंत यांच्याशी नातं स्पष्ट

उदय सामंत यांच्याबाबत विचारले असता नाईक म्हणाले की, ते आमचे चांगले मित्र आहेत. त्यांनी पक्ष बदलल्यावरही आमचं नातं कायम आहे. आम्ही त्या वेळीही उद्धव ठाकरे यांच्यासोबत होतो आणि आताही आहोत.

अवैध वाळू उपसा आणि सरकारच्या कारभारावर वैभव नाईक यांनी घणाघाती टीका करत प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number