Pankaja Munde : ‘फसवणूक करून पैसे कमावाल, तर तुरुंगात…’ पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना कडक इशारा

मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना अत्यंत कडक आणि स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे.

Pankaja Munde : ‘फसवणूक करून पैसे कमावाल, तर तुरुंगात…’ पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना कडक इशारा

Pankaja Munde : भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना अत्यंत कडक आणि स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. “चुकीच्या मार्गाने श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहू नका. जर कष्टाने पैसे कमावले तर मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन, पण लोकांची फसवणूक करून संकटात सापडलात, तर माझ्याकडून मदतीची अपेक्षा करू नका,” अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांची कानउघडणी केली. अंबाजोगाई येथे आपल्या नवीन जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

प्रामाणिकपणाची साथ आणि कुटुंबाची जबाबदारी
पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात नैतिकतेवर विशेष भर दिला. त्या म्हणाल्या, “माझा कार्यकर्ता आजारी असेल, तर मी स्वतःचे घर गहाण ठेवून त्याला मदत करेन. पण जर कुणी 40-50 लाखांची लोकांची फसवणूक करून माझ्याकडे आले, तर मी त्याला मदत करणार नाही.” याचवेळी त्यांनी पालकांनाही मोलाचा सल्ला दिला. मुलाकडे अचानक पैसा कुठून येतोय, हे घरातील महिलांनी आणि वडिलांनी विचारले पाहिजे, तरच मुले चुकीच्या मार्गाला लागणार नाहीत, असे त्यांनी नमूद केले.

मोदींच्या धोरणांचा दाखला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीचा दाखला देत पंकजा मुंडे यांनी भ्रष्टाचारावर ताशेरे ओढले. “चुकीच्या मार्गाने पैसे कमावणाऱ्यांची जागा तुरुंगात आहे, हे मोदीजींनी दाखवून दिले आहे. तुम्ही 10 रुपयांचे 100 रुपये करा, पण ते कष्टाचे असावेत. एखादे 10 लाखांचे कंत्राट मिळाले तर त्यातून रास्त नफा कमवा, पण कामाचे पूर्ण पैसे गायब करू नका,” असा स्पष्ट संदेश त्यांनी कंत्राटदार आणि कार्यकर्त्यांना दिला.

“ज्यांनी कारस्थान केले, ते नकाशावरून गायब झाले”
राजकारणातील गटबाजी आणि फोडाफोडीवर भाष्य करताना पंकजा मुंडे यांनी विरोधकांना अप्रत्यक्ष टोला लगावला. “काही लोक आपल्याला वापरून दुसऱ्याकडे जातात. पण माझ्याविरुद्ध ज्यांनी कारस्थान केले, ते आज राजकारणाच्या नकाशावरून गायब झाले आहेत. माझ्या हृदयात पाप नाही, त्यामुळेच ईश्वरी शक्ती नेहमी माझ्या पाठीशी असते,” असे सांगत त्यांनी ‘निसर्ग न्याय करतो’ यावर विश्वास व्यक्त केला.

हेही वाचा – Raigad NCP Banner : रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवर फक्त तटकरे! सुनेत्रा पवार, अजित पवारांना वगळलं; चर्चांना उधाण

आगामी निवडणुकांचा ‘रोडमॅप’ आणि विजयाचा निर्धार
या कार्यक्रमानिमित्त पंकजा मुंडे यांनी आगामी निवडणुकांसाठी जिल्ह्याचा राजकीय संकल्पही जाहीर केला. “जिल्ह्यातील 6 आमदार आणि खासदारही आमचाच असेल, या जिद्दीने आम्ही योगेश्वरी देवीच्या साक्षीने कामाला सुरुवात करत आहोत. यश-अपयश ईश्वराच्या हाती असले, तरी माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझे सर्वस्व पणाला लावेन,” असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number