Prakash Mahajan on Raj Thackeray: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांची पातळी खालावली असून, आता वैयक्तिक टीका टिप्पणीला ऊत आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या राज आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीचा समाचार घेताना, शिंदे गटाचे नेते प्रकाश महाजन यांनी राज ठाकरे यांच्यावर अत्यंत बोचरी आणि जहरी टीका केली आहे. 'राज ठाकरे सध्या वैफल्यग्रस्त झाले असून, सत्तेसाठी त्यांनी हिंदुत्वाला तिलांजली दिली आहे,' असा खळबळजनक आरोप महाजन यांनी केला.
मराठीचा मुद्दा केवळ निवडणुकीचा मुखवटा
प्रकाश महाजन यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना म्हटले की, ही केवळ सत्तेसाठी केलेली 'चावडी' आहे. ज्यांनी मराठी माणसासाठी प्रत्यक्षात काहीच केले नाही, ते आज केवळ निवडणुकीत यश मिळवण्यासाठी मराठीचा बुजगावणं उभं करत आहेत. हे नेते एसीमध्ये जन्मले आहेत, त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी काहीही देणंघेणं नाही, अशा शब्दांत त्यांनी ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. तसेच, उद्या चुकून यांची सत्ता आलीच, तर त्यांच्या बायकांमध्येच भांडणं लागतील, असे वादग्रस्त विधानही त्यांनी यावेळी केले.
महेश मांजरेकर आणि संजय राऊतांवर निशाणा
या मुलाखतीचे सूत्रसंचालन करणारे महेश मांजरेकर यांच्यावरही महाजनांनी हल्ला चढवला. मांजरेकरांना नेमकी कशाची भीती वाटतेय? ज्यांचे मित्र अंडरवर्ल्डमध्ये आहेत, त्यांनी प्रदूषणासारख्या मुद्द्यांवरून रडगाणे गाणे हास्यास्पद आहे, असेही ते म्हणाले. तसेच, संजय राऊत यांच्यावर टीका करताना ही मुलाखत म्हणजे तीन वर्षांपूर्वीच्या एका फ्लॉप मुलाखतीचा 'सीक्वल' असल्याची बोचरी टिप्पणीही यावेळी महाजन यांनी केली.
हेही वाचा – PMC Election 2026: ऐन निवडणुकीत अजित पवारांना पुण्यात मोठा धक्का! मोठ्या नेत्याची निवडणुकीतून एक्झिट
मनसेतील गळती आणि हिंदुत्वाचा मुद्दा
दरम्यान, राज ठाकरे यांनी अलीकडे मुस्लिमांच्या संदर्भात घेतलेल्या भूमिकेवर महाजन यांनी प्रश्न उपस्थित केले. तुमचे हिंदुत्व कुठे गेले? रशीद मामूंच्या जवळ जाण्यासाठी तुम्ही चंदू मामांना विसरलात, असा टोला त्यांनी लगावला. संतोष धुरी यांच्या भाजप प्रवेशावर बोलताना ते म्हणाले की, राज ठाकरेंच्या भोवती ठराविक लोकांचेच कोंडाळे आहे आणि संदीप देशपांडे यांच्यासारखे नेतेही तिथे आनंदी नाहीत. एकनाथ शिंदे यांच्या बंडाचे समर्थन करताना महाजन यांनी, 50 लोकांचे बाहेर पडणे हे पैशासाठी नसून स्वाभिमानासाठी होते, असंही नमूद केलं.