Rajabhau Waje: नाशिकचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांनी त्यांच्या पक्षांतराबाबत सुरू असलेल्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आपण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासोबतच आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खासदार संजय राऊत यांनी ‘फुटणाऱ्या खासदारांना 15 कोटी रुपये ॲडव्हान्स मिळणार’ असा दावा केला होता. यावर बोलताना राजाभाऊ वाजे म्हणाले की, “माझ्याशी कोणीही संपर्क साधलेला नाही. त्यामुळे पैशांच्या ऑफरचा किंवा कोणत्याही प्रलोभनाचा प्रश्नच उद्भवत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जर माझ्याशी संपर्क साधायचा असता, तर त्यांनी आधीच तसा प्रयत्न केला असता. पण मी जिथे आहे, तिथेच म्हणजेच ठाकरेंसोबतच राहणार आहे.”
शिवसेनेने आम्हाला आमदारकी, खासदारकी दिली; वाजे कुटुंबियांची स्पष्टोक्ती
या संदर्भात राजाभाऊ वाजे यांचे बंधू प्रकाश वाजे यांनीही कुटुंबाची आणि पक्षाची भूमिका स्पष्ट केली. “शिवसेनेने (ठाकरे गट) आम्हाला आमदारकी आणि खासदारकी दिली आहे, त्यामुळे आम्ही व्यावसायिक राजकारण करत नाही,” असे प्रकाश वाजे म्हणाले. शिवसेनेत सध्या ‘ऑपरेशन टायगर’ सुरू असल्याच्या चर्चांवर बोलताना त्यांनी सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत आम्हाला पक्ष सोडायचा नाही, हे मी राजाभाऊंना आधीच स्पष्ट केले आहे. पक्षाशी एकनिष्ठ राहून उद्धव ठाकरेंसोबतच पुढे जाण्याचा निर्णय वाजे कुटुंबियांनी घेतला आहे.
‘त्या’ भेटीवर प्रकाश वाजेंचा मोठा खुलासा
दरम्यान, पक्षांतरासाठी झालेल्या कथित प्रयत्नांवर प्रकाश वाजे यांनी एक महत्त्वाचा खुलासा केला. त्यांनी सांगितले की, “काही मंडळी राजाभाऊ वाजे यांना ठाण्याला बोलावण्यासाठी आमच्याकडे आली होती. आम्ही त्यांच्याकडे गेलो नव्हतो, तर ती मंडळी स्वतःहून आली होती. ती ठाण्याची मंडळी कोण होती, हे मी ओळखत नाही. राजाभाऊंनी त्यांना स्पष्ट सांगितले की, मी स्वतः कोणताही निर्णय घेऊ शकत नाही, म्हणूनच ते माझ्याकडे आले होते.” याच दरम्यान नार्वेकर यांचा फोन आल्याचे सांगत, आम्ही तात्काळ उद्धव ठाकरे यांना संपर्क करून ‘आम्ही पूर्णपणे तुमच्यासोबत आहोत’ अशी ग्वाही दिल्याचे प्रकाश वाजे यांनी स्पष्ट केले.