‘रात्रीस खेळ चाले 2’ (Ratris Khel Chale 2 Marathi TV serial) या मालिकेतील अण्णा नाईक आणि शेवंता (Anna Naik and Shevanta) या व्यक्तिरेखांचं प्रेम प्रकरण चांगलंच गाजतंय. मात्र त्यांच्या रोमँटिक फोटोने पुण्यातील एका शहर समुपदेशकाला जेलमध्ये धाडलं आहे. अण्णांच्या मिठीतल्या शेवंताचा फोटो पाठवल्याबद्दल महिला होमगार्डने शहर समुपदेशकावर विनयभंगाचा (Moletation) गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी उत्तम साळवी हा शहर समुपदेशक म्हणून काम करतो. 2019 सालच्या मार्च महिन्यापासून साळवी फिर्यादी होमगार्ड महिलेशी मोबाईलवर मेसेजेस पाठवून जवळीक वाढवायचा प्रयत्न करत होता.
फुलेनगर येथील कार्यालयात काम करणाऱ्या 28 वर्षीय होमगार्ड महिलेवर आरोपी साळवीची वाईट नजर होती.
तिला आरोपी वारंवार मेसेज करून जवळीक वाढवायचा प्रयत्न करत होता. तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होता.
आपल्यासोबत तिने फिरायला यावं यासाठी दबाव टाकत होता.
एवढंच नव्हे, तर आपल्या इच्छा पूर्ण न केल्यास कामावरून काढण्याचीही धमकी दिली.
सध्या टीव्हीवर गाजत असलेल्या ‘रात्रीस खेळ चाले 2’ मालिकेतील प्रौढ अण्णा नाईक या बाहेरख्याली व्यक्तिरेखेचा वयाने लहान आणि विवाहित शेवंता या व्यक्तिरेखेशी चालणारा रोमान्स विविध memes वरून viral होतोय.
आरोपी साळवीनेही असाच एका फोटो फिर्यादी महिलेला पाठवला. अण्णांच्या मिठीतील शेवंताचा फोटो पाठवून ‘प्रेमाला वय नसतं’ असा सूचक मेसेजही त्याने लिहिला होता.
अखेर फिर्यादी महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आता पुणे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.