बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या सैलानी बाबाच्या यात्रेत सोमवारी नारळाची होळी पेटवली जाणार आहे. सैलानी बाबाची यात्रा भरलेली आहे. यासाठी देशभरातून सर्व धर्मीय भावीक सैलानी गावात दाखल होत आहेत. कोरोनाच्या तीन वर्षाच्या काळानंतर पुन्हा एकदा सैलानी बाबा यात्रा महोत्सव साजरा केला जात आहे. मोठ्या संख्येत छोटे-मोठे व्यावसायिक देखील सैलानी गावात तळ ठोकून आहेत. त्यामुळे यंदा भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी बुलढाणा पोलीस यंत्रणे कडूनही तगडा बंदोबस्त उभारण्यात आला आहे. दुपारी तीन वाजता स्थानिक मुजावर यांच्या हस्ते या नारळाच्या होळीचं पूजन करून ही नारळाची होळी पेटवली जाणार आहे. ज्यासाठी सैलानी बाबांच्या या यात्रेत भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळणार आहे.
काळे बाहुले, लिंबू, गोटे, खिळे, बिबे टाचलेली नारळ मनोरुग्णांच्या अंगाखांद्यावरून ओवाळून जळणाऱ्या होळीत टाकल्याने अंगातील व्याधी दूर होतात अशी भावना भक्तांमध्ये आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी तब्बल पंधरा ते वीस ट्रक भरतील एवढ्या नारळांची होळी येथे केली जाते. होळीच्या जागेभोवती बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. तर यात्रेदरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस दलातर्फे चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोबतच अग्निशामक दलेही आहेत. वाहतूक पोलीस, दामिनी पथक, आरसीपी पथकाची तुकडी तसेच गृहरक्षक दलाचे जवान देखील यात्रेमध्ये खडा पहारा देणार आहेत.