जळगाव शहरातील रामानंदनगर परिसरात हिट अँड रनची धक्कादायक घटना घडली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गिरणा टाकी ते चर्च दरम्यानच्या वर्दळीच्या रस्त्यावर भरधाव वेगाने आलेल्या कारने अचानक नियंत्रण गमावल्याने रस्त्यावरील तब्बल नऊ जणांना जोरदार धडक दिली.प्राथमिक माहितीनुसार, ही कार एका अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलाकडून चालवली जात होती. भरधाव वेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ही भीषण दुर्घटना घडली. या अपघातात दोन दाम्पत्यांसह एका तरुणाला गंभीर दुखापत झाली असून एकूण पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींमध्ये एका इलेक्ट्रिक दुचाकीवरील तरुणाचाही समावेश असून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे समजते. सर्व जखमींवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मात्र परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून अल्पवयीन चालक घाबरून कार घटनास्थळीच सोडून पसार झाला. त्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून अल्पवयीन मुलांकडून वाहन चालविण्याच्या वाढत्या घटनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. एवढ्या लहान वयात भरधाव वेगाने वाहन चालवल्याने इतका मोठा अपघात घडल्याने नागरिकांनी कडक कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी पोलिसांत अधिकृत नोंद झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र पोलिसांनी घटनेची दखल घेत तपास सुरू केल्याचे समजते. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे पुढील कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.या घटनेमुळे रामानंदनगर परिसरातील वाहतूक सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून स्थानिक प्रशासनाकडून अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.