मुंबई: देशातील बँकिंग क्षेत्रात अलीकडेच काही मोठ्या खाजगी बँकांमधील गोंधळामुळे ग्राहकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असतानाच गुरुवारी सकाळी आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या एचडीएफसी बँकेचे चेअरमन अतानू चक्रवर्ती यांनी अचानक राजीनामा दिला. बँकेत काही गोष्टी तत्त्वांच्या विरोधात असल्याचे सांगत त्यांनी पद सोडल्याचे समजते. या घडामोडींमुळे ग्राहकांमध्ये चिंता वाढण्याची शक्यता असताना रिझर्व्ह बँकेने तातडीने हस्तक्षेप करत केकी मिस्त्री यांच्याकडे बँकेची तात्पुरती धुरा सोपवली आहे.
रिझर्व्ह बँकेने केकी मिस्त्री यांची एचडीएफसी बँकेचे अंतरिम चेअरमन म्हणून नियुक्ती केली आहे. मिस्त्री हे देशातील अनुभवी बँकर आणि वित्तीय क्षेत्रातील दिग्गज मानले जातात. सध्या ते बँकेचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे बँकेच्या कामकाजाची त्यांना सखोल माहिती असल्यानेच रिझर्व्ह बँकेने त्यांच्यावर विश्वास ठेवत ही जबाबदारी दिल्याचे मानले जाते.
चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या केकी मिस्त्री यांनी 1981 मध्ये एचडीएफसीमध्ये सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कारकीर्द सुरू केली. त्यानंतर पुढील काही वर्षांत त्यांनी विविध पदांवर काम केले आहे. 1993 मध्ये ते कार्यकारी संचालक झाले, तर 2000 मध्ये त्यांची व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली. 2007 मध्ये ते उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक झाले.
1 जानेवारी 2010 पासून ते बँकेचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. 1 जुलै 2023 रोजी एचडीएफसी लिमिटेडचे एचडीएफसी बँकेत विलिनीकरण झाल्यानंतर ते बँकेचे कार्यकारी संचालकही बनले. आता रिझर्व्ह बँकेने त्यांना तीन महिन्यांसाठी अंतरिम चेअरमनची जबाबदारी दिली आहे.
केकी मिस्त्री यांचा वित्तीय क्षेत्रातील अनुभव अत्यंत व्यापक आहे. ते एचडीएफसी लाईफ इन्शुरन्सचे चेअरमन आहेत. त्याचबरोबर एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्सचेही चेअरमन म्हणून काम पाहत आहेत. याशिवाय टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, द ग्रेट ईस्टर्न शिपिंग आणि फ्लिपकार्ट प्रायव्हेट लिमिटेड (सिंगापूर) यांच्या संचालक मंडळावरही त्यांचा समावेश आहे.
ते सेबीच्या अनेक महत्त्वाच्या समित्यांमध्येही नेतृत्वाच्या भूमिकेत राहिले आहेत. प्राथमिक बाजार सल्लागार समितीचे ते अध्यक्ष राहिले असून बी20 टास्क फोर्सचे सह-अध्यक्षही होते. त्यामुळे वित्तीय धोरणे आणि बाजारव्यवस्थेचा त्यांना मोठा अनुभव आहे.
एचडीएफसी समूहाला मोठ्या उंचीवर नेण्यातही केकी मिस्त्री यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली एचडीएफसी बँक, एचडीएफसी एएमसी, एचडीएफसी लाईफ आणि एचडीएफसी एर्गो यांसारख्या कंपन्यांची मजबूत उभारणी झाली. त्यांच्या कार्यकाळात एचडीएफसी समूहाचे बाजारमूल्य आणि कर्जपुस्तक मोठ्या प्रमाणात वाढून सुमारे सात लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. गृहकर्जासारख्या स्थिर कर्ज श्रेणीला प्राधान्य देण्यामध्येही त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे.