मुंबईमध्ये रविवारचा संपूर्ण दिवस मुंबई उपनगरे, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात पावसाची संततधार होती. उपनगरांमध्ये काही ठिकाणी गडगडाटासह पाऊस मुंबईकरांनी अनुभवला. त्या तुलनेत पश्चिमेकडे अंधेरीपासून चर्चगेटपर्यंत पुढे तर पूर्वेकडे विक्रोळीपासून कुलाब्यापर्यंत फारसा पाऊस नव्हता. नवी मुंबईमध्येही काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. रविवारी दिलेल्या अद्ययावत इशाऱ्यानुसार सोमवार ते बुधवार या कालावधीत मुंबईला ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे, तर सोमवारसाठी रायगड आणि रत्नागिरीला रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. पुणे आणि सातारा येथेही घाट परिसरात अतितीव्र मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुसळधार पावसामुळे राज्यासह कोकण आणि रायगड जिल्ह्यातील अनेक भागात जनजीवन विस्कळित झाले आहे. अनेक सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. दरम्यान, हवामान खात्याने रायगड सह रत्नागिरी जिल्ह्यात ७ आणि ८ ऑगस्ट असे सलग दोन दिवस रेड अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई आणि ठाण्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यादरम्यान समुद्रात १२ ते १४ फूट उंच लाटा उसळतील. हायटाइडमुळे लोकांना समुद्रापासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संततधार पावसामुळे राज्यातील अनेक भागात पाणी साचले आहे. पुढील काही दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याप्रमाणे येत्या पाच दिवसांत मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.