अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणूकीचे बिगुल वाजत आहे. बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होईल. त्यानंतर 4 मे रोजी बारामतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. याचपार्श्वभूमिवर अजित पवारांच्या निधनानंतर महायुतीकडून सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विरुद्ध काँग्रेसकडून उमेदवार देण्यात आला आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. मात्र ही निवडणूक बिनविरोध व्हावी या करीता आणि अर्ज मागे घेण्यासंदर्भात सुनेत्रा पवार यांनी हर्षवर्धन सकपाळ यांना फोन देखील केला होता. त्यानंतर बारामती पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी, यासाठी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक प्रयत्न सुरू केले असून रोहित पवार यांनी देखील कॉंग्रेस हर्षवर्धन सकपाळ यांची आज भेट घेतली. यानंतर आता कॉंग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी अर्ज मागे घेण्याबाबत आणि पोटनिवडणुक बिनविरोध लढण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
यावेळी हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत महाराष्ट्रात रितसर गुन्हा दाखल व्हावा. जर ही मागणी पूर्ण झाली, तर मी बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेस उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार आहे. आमची अट, शर्त कुठल्याही प्रकारे चुकीची नाही. खरतर त्या अटीची गरजच नव्हती, गुन्हा दाखल व्हावा यासाठी पोलीस स्टेशनमध्ये बसाव लागत. महाराष्ट्रात गुन्हा दाखल होत नसेल तर कर्नाटकात गुन्हा दाखल करावा, पण आपलं सरकार अजित पवार यांच्या दुर्घटनेचा गुन्हा नोंदवत नाही. आमच्या मागणी आधीच त्यांनी हा गुन्हा दाखल करायला हवा होता. आमची अट चुकीची नाही. आमच्या उमेदवारांनी स्थानिक पातळीवर भूमिका घेतली की अजित दादांच्या अपघातासंदर्भात महाराष्ट्रात गुन्हे दाखल करावे आणि मग मी माघार घेतो.”
सपकाळांची सरकारावर घणाघाती टीका
“गुन्हा दाखल करावा यासाठी पोलिसांशी हुज्जत घालावी लागते, गुन्हा महाराष्ट्रात दाखल होत नाही म्हणून कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल करावा लागतो. हा तर सरकारचा वाभाडे निघण्याचा प्रकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस किती श्रूड आहेत, या गोंधळात ते गुन्हा नोंदवून देत नाहीत अजित दादांच्या अपघाताची चौकशी होऊ देत नाही, हे झारीतले शुक्राचार्य म्हणून फडणवीस बसले आहेत. हे सरकार मूकं, बहिरं आणि आंधळं आहे, हे तर आम्ही आधीपासूनच म्हणत होतो, आता या प्रकरणानंतर हे सरकार असंवेदनशील आणि बेशरम असल्याच देखील समोर येत आहे.”
बिनविरोध निवडणूक लढवण्यावर सपकाळांची भूमिका
“15 मार्च पासून 5 एप्रिलपर्यंत त्यांनी कुणीही आमच्याशी संपर्क का साधला नाही. राष्ट्रवादीचे खासदार राज्यसभा आणि लोकसभेत आहे. आमच्या दिल्लीतील नेत्यांनी भेटले नाही. राष्ट्रवादीलाच सुनेत्रा पवार यांच्या निवडणुकीशी काही घेणं देणं नव्हतं का? राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील आमची भेट घेतली. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणुक ही भावनिकदृष्ट्या पाहिली जात आहे. त्यामुळे बारामती पोटनिवडणुक बिनविरोध लढवावी अशी मागणी आणि विनंती करण्यासाठीच रोहित पवार यांनी भेट घेतली होती. सुनेत्रा पवार यांनी दोन वेळा आमच्यासोबत संपर्क साधला आणि निवडणूक बिनविरोध लढण्याची विनंती केली होती. ज्या बिनविरोध निवडणुकांसाठी विनंती केली जात आहे. त्यासंदर्भात आम्ही आमच्या पक्षातील बड्या नेत्यांसोबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ.”