राज्यात सध्या स्वयंघोषित बाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. धर्माच्या नावाखाली महिलांशी अश्लील कृत्ये केल्याचा खरातचे अनेक व्हिडिओ समोर आले असून आरोपी कॅप्टन अशोक खरातवर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान खरातला शिक्षा व्हावी यासाठी अनेक राजकीय पक्षातील नेते प्रतिक्रिया मांडत आहेत. त्याचप्रमाणे अँडकेट गुणरत्न सदावर्ते यांनी देखील खरात प्रकरणावर आपली प्रतिक्रिया मांडली होती.
मात्र ही प्रतिक्रिया मांडण गुणरत्न सदावर्ते यांच्या जीवावर आलं आहे. अँडकेट गुणरत्न सदावर्ते यांना खरात समर्थकांकडून धमकीचे फोन आल्याची माहिती आहे. अशोक खरात यांना सरकारने फाशी दिली पाहिजे असं वक्तव्य गुण रत्न सदावर्ते यांच्याकडून करण्यात आले होते. या विधानामुळे संतापलेल्या खरात समर्थकांकडून आता गुणरत्न सदावर्ते यांना फोन करून शिवीगाळ केली तसेच धमकी दिली असल्याचे समोर आले आहे. अशोक खरात प्रकरणात तुम्ही काही बोलू नका नाहीतर त्याचा परिणाम चांगला होणार नाही अशा धमक्या देखील खरात समर्थकांकडून दिल्या जात आहे.
इतरांच्या आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी तंत्र-मंत्र करण्याचा दावा करणारा भोंदू अशोक खरात स्वत: मोठ्या अडचणीत आला आहे. श्रद्धेचा बाजार मांडून अध्यात्माच्या नावाखाली वासनेचा आणि काळ्या पैशांचा महाल उभारणारा नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात केवळ निष्पाप महिलांचे लैंगिक शोषण करत नसून भक्तीच्या नावाखाली आर्थिक गैरव्यवहारांचे एक महाकाय जाळे विणायचा. नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि गुरू कॅप्टन अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत असून पोलिसांकडून त्याच्यावरील कारवाईसाठी योग्य तो तपास सुरु आहे.