मध्यप्रदेश: मध्य प्रदेशातील रतलामजवळ रविवारी पहाटे राजधानी एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. तिरुवनंतपुरम ते हजरत निजामुद्दीन दरम्यान धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसच्या बी-1 वातानुकूलित डब्यात अचानक आग लागल्याने काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र रेल्वे गार्ड आणि कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.
ही घटना सकाळी सुमारे 5.20 वाजण्याच्या सुमारास कोटा विभागातील लुनिरीच्छा आणि विक्रमगड आलोट स्थानकांदरम्यान घडली. ट्रेन वेगाने धावत असताना गार्डच्या लक्षात बी-1 डब्यातून धूर निघत असल्याचे आले. परिस्थितीची गंभीरता ओळखत त्यांनी तत्काळ लोको पायलटला माहिती दिली. त्यानंतर काही क्षणांतच ट्रेन थांबवण्यात आली आणि नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यात आला.
आग वेगाने पसरत असल्याने रेल्वे कर्मचारी, सीआरपीएफ जवान आणि सुरक्षा पथकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. बी-1 डब्यात एकूण 68 प्रवासी होते. सर्व प्रवाशांना काही मिनिटांत सुरक्षित बाहेर काढण्यात आले. यानंतर आग इतर डब्यांपर्यंत पोहोचू नये म्हणून संबंधित डबा ट्रेनपासून वेगळा करण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि रेल्वेची तांत्रिक पथके घटनास्थळी दाखल झाली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले. मात्र तोपर्यंत संबंधित डबा मोठ्या प्रमाणात जळून खाक झाला होता. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
प्राथमिक माहितीनुसार, आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. रेल्वे प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली असून तांत्रिक बिघाडाची शक्यता तपासली जात आहे. रतलामचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) घटनास्थळी रवाना झाले असून विशेष तांत्रिक पथकेही पाठवण्यात आली आहेत.
या घटनेमुळे काही काळ रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता. काही गाड्या उशिराने धावल्या, तर काहींचे मार्ग तात्पुरते बदलण्यात आले. नंतर अपलाइन सेवा पुन्हा सुरू करण्यात आली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
या घटनेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून धुराच्या लोटांमध्ये जळणारा डबा आणि प्रवाशांची धावपळ पाहून अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. गार्ड आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.