मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांच्याविरोधात खटला चालवण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी मंजुरी दिल्याची माहिती अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) विशेष न्यायालयात दिली आहे. या मंजुरीनंतर संबंधित प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रियेला वेग मिळण्याची शक्यता असून पुढील सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात ईडीच्या वतीने मंजुरीसंदर्भातील अधिकृत पत्र सादर करण्यात आले. तपास यंत्रणेने न्यायालयाला सांगितले की, राज्यपालांकडून आवश्यक कायदेशीर मंजुरी मिळाल्यानंतर आता प्रकरणात पुढील प्रक्रिया सुरू करता येणार आहे. त्यामुळे आरोप निश्चित करण्याची आणि खटल्याच्या सुनावणीची प्रक्रिया पुढे सरकण्याची शक्यता आहे.
ईडीने न्यायालयात काय सांगितले?
ईडीने न्यायालयाला सादर केलेल्या पत्रात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार (PMLA) सुरू असलेल्या तपासासाठी आवश्यक परवानगी मिळाल्याचे नमूद केले आहे. संबंधित मंजुरी राज्यपालांनी दिल्यानंतर प्रकरणातील कायदेशीर अडथळे दूर झाल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.
देशमुखांचा तपासावर सवाल
दरम्यान, या घडामोडीनंतर अनिल देशमुख यांनी तपासाच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी परमबीर सिंग यांचा उल्लेख करत, गंभीर आरोप करणाऱ्या व्यक्तीला आरोपी करण्यात आले नाही, मग निवडक कारवाई का केली जात आहे, असा सवाल उपस्थित केला. तपास यंत्रणांनी सर्व बाजूंनी समान निकषांवर चौकशी करावी, अशी त्यांची भूमिका आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
या प्रकरणाची सुरुवात 2021 मध्ये तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रानंतर झाली होती. त्या पत्रात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुंबईतील बार, रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात वसुलीचे लक्ष्य दिल्याचा आरोप करण्यात आला होता.
श्री मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटेलिया या घरासमोर स्फोटके ठेवण्याच्या प्रकरणाचा मास्टरमाईंड तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग असल्याचे #ATS तपासात पुढे आले होते. त्यामुळेच मी त्याची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून दुय्यम पदावर बदली केली होती. त्यानंतर परमबीर सिंगने… pic.twitter.com/u8PYxZmT45 — ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) August 4, 2026