Gondia crime: कर्ज फेडायचं नव्हतं म्हणून रचला सिनेस्टाइल कट; आधी मित्राचा जीव घेतला, खिशात आधारकार्ड-एटीएम ठेवलं अन्…; आरोपी 8 महिने मोकाट

गोंदियामध्ये बँकेच्या कर्जातून सुटका मिळवण्यासाठी एका तरुणाने स्वतःचाच मृत्यू दाखवत मित्राचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Gondia crime: कर्ज फेडायचं नव्हतं म्हणून रचला सिनेस्टाइल कट; आधी मित्राचा जीव घेतला, खिशात आधारकार्ड-एटीएम ठेवलं अन्…; आरोपी 8  महिने मोकाट

गोंदिया जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि थरारक गुन्हा समोर आला असून, आर्थिक अडचणीत अडकलेल्या एका तरुणाने स्वतःचाच मृत्यू दाखवण्यासाठी आपल्या मित्राचाच जीव घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. तब्बल आठ महिने पोलिसांना आणि कुटुंबीयांना गुंगारा दिल्यानंतर अखेर या संपूर्ण कटाचा पर्दाफाश झाला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

आमगाव तालुक्यातील डोंगरगाव येथे राहणाऱ्या अंतिम ओमप्रकाश खोटेले या 28 वर्षीय तरुणाने पोल्ट्री फार्म व्यवसायासाठी देवरी येथील अर्बन बँकेतून पाच लाखांचे कर्ज घेतले होते. मात्र व्यवसायातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने तो मोठ्या आर्थिक तणावात होता. कर्ज फेडण्याचा मार्ग न दिसल्याने त्याने धक्कादायक कट रचल्याचे तपासातून समोर आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अंतिम खोटेलेने स्वतःला मृत दाखवून कर्जातून कायमची सुटका मिळवण्याची योजना आखली. त्यासाठी त्याने गावातील परिचित आणि मित्र असलेल्या 46 वर्षीय चंद्रकुमार सराटे यांना लक्ष्य केले. 28 ऑगस्ट 2025 रोजी रात्री तो चंद्रकुमार यांच्या घरी गेला आणि काही काम असल्याचे सांगून त्यांना दुचाकीवर घेऊन बाह्मणी परिसरातील रेल्वे पटरीजवळ नेले.

तिथे आरोपीने चंद्रकुमार यांना दारू पाजली. ते पूर्णपणे नशेत गेल्यानंतर त्याने स्वतःच्या दुपट्याने त्यांचा गळा आवळून खून केल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपीने मृतदेहावर स्वतःचे कपडे घातले. मृतदेहाजवळ स्वतःचे आधार कार्ड आणि एटीएम कार्ड ठेवून रेल्वे अपघातात स्वतःचाच मृत्यू झाल्याचा आभास निर्माण केला.

घटनास्थळी स्वतःची दुचाकी सोडून आरोपी फरार झाला. या प्रकारामुळे सर्वांनाच अंतिम खोटेलेचा मृत्यू झाल्याचा विश्वास बसला होता. बँकेचे कर्जही त्याच्यासोबत संपल्याचे दाखवण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र चंद्रकुमार सराटे यांच्या कुटुंबीयांना सुरुवातीपासूनच संशय होता.

चंद्रकुमार यांचे भाऊ रमेश सराटे यांनी आमगाव पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. मोबाईल लोकेशन, कागदपत्रे आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी अंतिम खोटेले जिवंत असल्याचे उघड केले. विशेष म्हणजे आरोपीच्या वडिलांनीच त्याला पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती समोर आली आहे.

या संपूर्ण घटनेने गोंदिया जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, कर्जाच्या तणावातून एका तरुणाने इतक्या थंड डोक्याने मित्राचा जीव घेतल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number