मृग नक्षत्र लागूनही आणि राज्यभरात अन्यत्र पावसाने हजेरी लावली असूनही गोंदिया जिल्ह्याला मात्र दिलासा मिळालेला दिसत नाही. उलट मे महिन्यापेक्षा जास्त ऊन आता पडत आहे. सोमवारी गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान ४३.२ अंशांवर होते. हे दोन्ही जिल्हे विदर्भात सर्वात ‘हॉट’ ठरले. जून महिन्याचे १२ दिवस लोटूनही पावसाने पाहिजे तशी हजेरी अद्याप लावलेली नाही. रविवारी जिल्ह्यातील तिरोडा आणि अर्जुनी-मोरगाव तालुक्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. दररोज ढग दाटून येत असल्याने आता पाऊस बरसणार असे दिसत असतानाच पाऊस हुलकावणी देत आहे. परिणामी उन्हाची लाही कमी झालेली नाही. उलट मे महिन्यापेक्षा जास्त तपमानाची नोंद केली जात आहे. अकोला जिल्ह्याचे तापमान ४२.८ अंशांवर असल्याने अकोला दुसऱ्या तसेच ४२.७ अंश तापमानाने ब्रह्मपुरी तिसऱ्या क्रमांकावर होते.