गेल्या काही दिवसांपासून डान्सर गौतमी पाटील चर्चेत आहे. तिचा डान्स आणि कार्यक्रमांना होणारी गर्दी यामुळे तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला असून, तिच्यावर टीका करणाऱ्यांचीही संख्या लक्षणीय आहे. डान्सर गौतमी पाटीलचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. गौतमी पाटीलचं चेंजिंग रुममध्ये चोरुन चित्रीकरण करण्यात आलंय. त्यानंतर संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी सोशल मीडियावर सकाळपासून संतापाची लाट उसळली आहे. अखेर या प्रकरणी राज्य महिला आयोगालादेखील दखल घ्यावी लागली आहे. महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरता कृती कार्यक्रम जाहीर करा, असा आदेश राज्य महिला आयोगाने सायबर विभाग आणि पोलीस महानिरीक्षकांना दिलेला आहे.
पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान, कपडे बदलताना हा व्हिडीओ चोरून चित्रित करण्यात आला. तसेच नंतर गौतमी पाटीलला बदनाम करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या धक्कादायक प्रकारामुळे खळबळ उडाली असून, या प्रकरणी पोलीस ठाण्यात तीन इन्स्टाग्राम अकाऊंट असलेल्या एका व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपीने गौतमी पाटील ही कपडे बदलत असताना तिचे व्हिडीओ चित्रित करून काढलेला व्हिडीओ इन्स्टाग्राम व व्हॉट्सअॅपवर प्रसारित करून तसेच फिर्यादी व इतर सहकाऱ्यांचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
गौतमीच्या डान्समुळे आणि प्रसिद्धीमुळे अनेकांची दुकानं बंद झाल्याचा दावा तिच्या चाहत्यांकडून केला जात होता. या दरम्यान तिचा चेजिंग रुममधला एक व्हिडीओ समोर आला. संबंधित व्हिडीओ तिला नकळत तयार करण्यात आलाय. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. संबंधित व्हिडीओ पुढे शेअर करु नका, असं आवाहन अनेकांकडून करण्यात आलं. या प्रकरणाची महिला आयोगाने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात येत होती. अखेर महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.