मालदीवमध्ये स्कूबा डायव्हिंगदरम्यान घडलेल्या एका भीषण दुर्घटनेने जगभरात खळबळ उडाली आहे. समुद्रातील सागरी गुहांचा शोध घेण्यासाठी खोल पाण्यात उतरलेल्या पाच पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे मृतांपैकी चार जण इटलीतील एका विद्यापीठाशी संबंधित संशोधक आणि प्राध्यापक होते. या दुर्घटनेमागे ‘ऑक्सिजन टॉक्सिसिटी’ हे संभाव्य कारण असू शकते, असा प्राथमिक अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचही पर्यटक मालदीवमध्ये स्कूबा डायव्हिंगसाठी गेले होते. ते ‘ड्यूक ऑफ यॉर्क’ नावाच्या यॉटवरून समुद्रात उतरले होते. समुद्राच्या तब्बल 164 फूट खोल पाण्यात जाऊन ते सागरी गुहा शोधण्याच्या मोहिमेत सहभागी झाले होते. मात्र पाण्यात गेल्यानंतर ते पुन्हा समुद्राच्या पृष्ठभागावर परतलेच नाहीत. काही वेळ प्रतीक्षा करूनही संपर्क न झाल्याने बोटीवरील कर्मचाऱ्यांनी त्यांना बेपत्ता घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांनी शोधमोहीम सुरू केली. दुर्घटना मालदीवची राजधानी मालेपासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर दक्षिणेकडील समुद्री भागात घडल्याचे सांगितले जात आहे. खराब हवामान आणि समुद्रातील प्रतिकूल परिस्थितीमुळे बचावकार्याला अडथळे निर्माण झाले.इटलीच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये जेनोआ विद्यापीठाशी संबंधित पर्यावरणशास्त्राच्या प्राध्यापिका मोनिका मोंटेफाल्कोने, त्यांची मुलगी आणि दोन संशोधकांचा समावेश आहे. या यॉटवर इटलीचे आणखी 20 नागरिक उपस्थित होते. त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून श्रीलंकेतील इटलीच्या दूतावासाकडून आवश्यक मदत पुरवली जात आहे.
या भीषण दुर्घटनेमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र स्कूबा डायव्हिंग क्षेत्रातील तज्ज्ञ मॉरिजियो युरास यांनी ‘ऑक्सिजन टॉक्सिसिटी’ची शक्यता व्यक्त केली आहे. समुद्राच्या अधिक खोल भागात गेल्यावर शरीरावर प्रचंड दाब निर्माण होतो. अशा वेळी ऑक्सिजनचे प्रमाण योग्य पद्धतीने नियंत्रित न झाल्यास ते शरीरासाठी धोकादायक ठरू शकते.तज्ज्ञांच्या मते, खोल समुद्रात डायव्हिंग करताना हवामान, समुद्रातील प्रवाह आणि ऑक्सिजन मिश्रण या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. हिंदी महासागरातील पाण्याची परिस्थिती तुलनेने अधिक धोकादायक मानली जाते. त्यामुळे अनुभवी डायव्हर्सनाही अशा मोहिमा जीवघेण्या ठरू शकतात.या दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने समुद्री मार्गावर यलो अलर्ट जारी केला आहे. परिसरातील जहाजे, मासेमारी नौका आणि इतर बोटींसाठी विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. मालदीवमध्ये स्कूबा डायव्हिंगदरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होण्याची ही दुर्मिळ घटना मानली जात आहे.