नुकत्याच पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक पार पडली. यावेळी भाजपने 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव करत 200 हून अधिक जागा जिंकल्या होत्या. दरम्यान पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील अलीपूर भागात असणाऱ्या एका 10 मजली शासकीय इमारतीला भीषण आग लागली आहे. या आगीत विधानसभा निवडणुकीदरम्यान 10 मतदारसंघांमध्ये वापरण्यात आलेल्या 4 हजार ईव्हीएम मशीन जळून खाक झाल्या असून मोठं नुकसान झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी अचानक अलीपूर भागात असणाऱ्या एका 10 मजली शासकीय इमारतीला भीषण आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला तब्बल 24 तासांहून अधिक वेळ लागला. या दहा मजली इमारतीमध्ये दक्षिण 24 परगणा जिल्हा परिषद कार्यालयाव्यतिरिक्त इतरही अनेक महत्त्वाची सरकारी कार्यालये आहेत.
या प्रकरणी आता पोलिसांनी एफआयआर नोंदवून सखोल तपासाला सुरुवात केली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच बंगालचे राज्यमंत्री कौशिक चौधरी यांनी घटनास्थळी भेट दिली आणि घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान अद्याप या आगीमागील कारण स्पष्ट झाले नसून या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.