राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री यांनी गेल्या काही दिवसांपासून अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर पारख ठेवली जात आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासारखेच माझ्या विरोधातही कटकारस्थान रचले जात असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. मलिकांनी केलेल्या या आरोपांवर भाजप नेते प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
नवाब मलिकांनी सादर केलेले दावे, पुरावे म्हणजेच खाई त्याला खवखवे अशी प्रतिक्रिया प्रविण दरेकर यांनी दिली आहे. नवाब मलिकांनी गेले काही दिवस पुरावे सादर करत अनेक आरोप केले आहेत, त्यामुळे आता विरोधी नेते मलिकांवर संतप्त झाले असून नवाब मलिकांना आता स्वत:चे कारनामे उघडकीस येण्याची भीती वाटत असल्याचे भाजप नेते प्रविण दरेकर यांनी सांगितले.
माझ्यावर काही लोक पाळत ठेवत असल्याचा आरोप नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेत केला. तसेच माझ्या नातवाच्या शाळेपर्यंत हे लोक पोहोचले आहेत. या हेरगिरी करणाऱ्यांची सर्व माहिती मिळाली आहे. त्यांच्याविरोधात मी लवकरच पोलिसात तक्रार दाखल करणार आहे, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सारखेच माझ्या विरोधातही कट रचण्यात येत असल्याचे मलिकांनी सांगितले आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात येत्या दिवसांत मी तक्रार करणार असल्याचे नवाब मलिक म्हणाले.