गेल्या आठवड्यापासून नाशिक शहरात अचानक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली असून, त्यातच शुक्रवारी एकाच दिवशी चौदा बाधित रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेला धडकी भरली आहे. तर नाशिक शहर व ग्रामीण भागातील रुग्णसंख्येने अर्धशतक पार केल्याने नागरिकांचीही धाकधूक वाढली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात एच३ एन२ या नवीन विषाणूने थैमान घातले आहे. त्यातच या रुग्णामधून नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. आरोग्य विभागाने कोरोनाचे सातत्याने रुग्ण वाढत असताना जोडीला देशपातळीवर घातक मानल्या गेलेल्या एच३ एन२ या नवीन विषाणूचेही दोन रुग्ण आढळल्याने संख्या नऊवर पोहोचली. दरम्यान हवामानातील बदलामुळे सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले, सरकारी आणि खासगी दवाखान्यात गर्दी होऊ लागली तर काही रुग्णांना कोरोना सदृश लक्षणे जाणवू लागल्याने त्यांचे नमुने घेतले असता, त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
नाशिक शहरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. गुरुवारी एकाच दिवसात अकरा तर गेल्या सोमवारी एकाच दिवसात बारा रुग्ण आढळले. तर शुक्रवार रोजी एकूण १४ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक शहरात रुग्णांच्या प्रमाणात होत असलेल्या वाढीमुळे नागरिकामध्येही धास्ती वाढली आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागात सहा रुग्ण सापडले आहेत. शहरापेक्षा ग्रामीण भागात कमी रुग्ण आहेत. गेल्या चार पाच दिवसांतच जिल्ह्यात कार ५० च्या वर कोरोना बाधितांची संख्या च्या पुढे गेली आहे.