राज्यातील शेतकरी आणि कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी किसान सभेने पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे. विविध मागण्यांसाठी शेतकरी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले ते लोणी पायी चालणार आहेत. शेतकऱ्यांचा हा पायी मोर्चा राज्याचे महसूल आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर धडकणार आहे.
नैसर्गिक आपत्ती आणि राज्यात सुरू असलेल्या नीतिभ्रष्ट राजकारणाचा परिणाम म्हणून शेतकरी, कामगार, शेतमजूर, कर्मचारी श्रमिकांचे मुलभूत प्रश्न अत्यंत तीव्र झाले आहेत. अखेर पुन्हा एकदा जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी किसान सभेच्या पुढाकाराने २६, २७, २८ एप्रिल २०२३ रोजी अकोले ते लोणी असा राज्यव्यापी पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. अखिल भारतीय किसान सभा, सीटू, बांधकाम कामगार फेडरेशन, अखिल गुरव समाज संघटना तसेच शेतमजूर युनियन, जनवादी महिला संघटना, डीवायएफआय, एसएफआय या समविचारी संघटनांच्या सहभागाने आयोजित हा मोर्चा तीन दिवस पायी चालून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर धडकणार आहे.
या मोर्चामध्ये किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे यांच्यासह राज्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजारो शेतकऱ्यांसह पायी चालणार आहेत. दुग्धजन्य पदार्थ आयात करण्याचे धोरण सरकार आखत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या विविध मागण्यांसह दुग्धजन्य पदार्थाच्या सरकारच्या धोरणाविरोधात मोर्चामध्ये आवाज उठवला जाणार आहे. तसेच कापूस, सोयाबीनचे पडलेले भाव यासह इतर प्रश्न अशा १८ मागण्यांचा समावेश या मोर्चात करण्यात आला आहे.
दरम्यान, ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणीची किसान सभेच्यावतीने करण्यात आली आहे.