शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी 2 लाखापर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केली गेली. मात्र ही कर्जमाफी नेमक्या कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार यासाठी अटी ठेवण्यात आल्या आहेत. 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकर्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली. तर जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात. त्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचे जाहीर केले.
मात्र कर्जमाफी कोणत्या बँकेत कर्ज असलेल्या शेतकर्यांना मिळेल यावरून मोठा संभ्रम आहे. यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे शेतकर्यांचा संभ्रम दूर झाला आहे. राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा फायदा होईल अशी चर्चा कालपासून शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे.
कोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ?
30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंतचे थकीत कर्ज माफ होणार आहे. तर नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अतिरिक्त 50 हजार रुपयांपर्यत लाभ मिळणार आहे. त्यांचे अतिरिक्त 50 हजारांचे कर्जही माफ होईल. पण ते नियमित कर्ज परतफेड करणारे शेतकरी असायला हवेत.
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, "आम्ही दोन लाखांपर्यंत कुठलीही बँक असो, ज्यांना पीक कर्ज देण्याचा अधिकार आहे अशा कोणत्याही बँकेने दिलेले पीक कर्ज हे आम्ही माफ करणार आहोत", असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.