Devendra Fadnavis : पुण्यात आयोजित काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'छात्रों की गूंज' या छात्र संवादावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या तरुणींच्या उपस्थितीबाबत आणि इव्हेंटच्या स्वरूपाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत धक्कादायक दावे केले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, या मेळाव्यात उपस्थित राहणाऱ्या 90 ते 95 टक्के विद्यार्थिनी या काँग्रेस नेत्यांच्याच शैक्षणिक संस्थांमधील आहेत. केवळ आपल्याच विचारसरणीच्या आणि नियंत्रित वातावरणात संवाद घडवून आणण्यासाठी पक्षाच्या संस्थांमधून या मुलींची नोंदणी करून घेण्यात आल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा आहे.
इन्फ्लुएन्सर्स आणि पैशांच्या वापरावर चौकशीचा बडगा
या सोहळ्याचे सोशल मीडियावर प्रमोशन करण्यासाठी मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचे आरोप समोर आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानुसार, कार्यक्रमात सहभागी झालेल्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना केवळ सकारात्मक (पॉझिटिव्ह) माहिती पोस्ट करण्याच्या अटीवरच पैसे देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. नकारात्मक माहिती पोस्ट केल्यास पैसे रोखले जातील, अशा प्रकारची सक्ती केली गेल्याचे त्यांनी सांगितले. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी या कार्यक्रमावर कोट्यवधी रुपयांची उधळण झाल्याचा आरोप करत पुराव्यासह तक्रार मांडली होती. या सर्व आर्थिक व्यवहारांची आणि आरोपांची सखोल पडताळणी पोलीस प्रशासनामार्फत केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
इव्हेंट मॅनेजमेंट आणि राजकीय राड्यावरून पोलिसांची कारवाई
एखादा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी प्रसिद्धीसाठी जसा वाद निर्माण केला जातो, तसाच प्रकार या कार्यक्रमाच्या बाबतीत काँग्रेसकडून घडवून आणला जात असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली. हा खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचा आवाज नसून केवळ एकतर्फी संवाद (मोनोलॉग) आणि प्रसिद्धीचा स्टंट असल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान, पुण्यात या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला अभाविप (ABVP) आणि एनएसयूआय (NSUI) कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली. या राड्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांनी काहींवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस प्रशासन या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत असून योग्य ती कायदेशीर कारवाई करेल, असे आश्वासन देण्यात आले आहे.