लॉकडाऊनच्या काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी ऑनलाईन खरेदीला पसंती दर्शवली. अनेकदा कुरिअरने मागवलेली वस्तू घरी आली की आपण लगेच उघडून पाहतो. मात्र, नागपूरमध्ये कुरिअरने मागवलेल्या घराच्या समानात विषारी कोब्रा साप आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
नागपूरमधील ज्ञानेश्वर नगरात सेवानिवृत्त शिक्षक सुनील लखाटे पत्नीसोबत राहतात. त्यांची मुलगी नोकरीनिमित्त बंगलोरमध्ये राहते. कोरोना काळात सर्वत्र ऑनलाईन झाल्यामुळे त्यांच्या मुलीचे कामही घरबसल्या सुरू झाले. त्यामुळे ती पुन्हा नागरपूरला आली. तीने आपले सामान आपल्या सहकारी मैत्रिणीच्या घरी ठेवले होते. मात्र वर्क फॉर्म होम संपण्याची शक्यता नसल्याने त्यांच्या मुलीने आपले सामान कुरिअरच्या माध्यमातून नागपूरमध्ये मागविले. सात ते आठ बॉक्स तसेच कंटेनरने तीने नागपूरला सामान मागविले. सामान नागपूरमध्ये पोहोचल्यानंतर कुरिअर कंपनीने ते काही दिवस सामान वाडी येथील गोडाऊनमध्ये ठेवले. त्या सामानाची डिलिव्हरी सोमवारी रात्रीच्या वेळी लखाटे कुटुंबीयांना दिली. मुलीने तीन ते चार बॉक्स उघडून पाहिले तर त्यात तीचे सामान होते. मात्र एका बॉक्समधून फुत्काराचा आवज येत असल्यामुळे कुटुंब घाबरले होते. त्यांनी लाकडाच्या मदतीने बॉक्स उघडला असता त्यात भलामोठा पाच फुटांचा नाग होता. बॉक्स उघडताच नाग सरसर निघून गेला. हा नाग विषारी कोब्रा जातीचा असल्याचा तेथील नागरिकांचे म्हणणे आहे. सुदैवाने नागाने कोणालाही डंस केले नाही.