Arvind Sawant : ‘मला उभा चिरला तरी ठाकरेंशी गद्दारी करणार नाही…’; खासदार फुटीच्या बातम्यांवर अरविंद सावंत यांचा संताप

ठाकरे गटाचे 8 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर सावंतांनी पत्रकार परिषद घेऊन या अफवांचा जोरदार शब्दांत निषेध केला.

Arvind Sawant : ‘मला उभा चिरला तरी ठाकरेंशी गद्दारी करणार नाही…’; खासदार फुटीच्या बातम्यांवर अरविंद सावंत यांचा संताप

Arvind Sawant: ‘मला उभा चिरलं तरी मी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही,’ अशा कडक शब्दांत शिवसेना (UBT) नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी आपल्या निष्ठेची ग्वाही दिली आहे. ठाकरे गटाचे 8 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर सावंतांनी पत्रकार परिषद घेऊन या अफवांचा जोरदार शब्दांत निषेध केला. त्यांनी या सर्व चर्चांना केवळ राजकीय षडयंत्र असल्याचे सांगत, अशा बातम्या पसरवणाऱ्यांचा समाचार घेतला.

पत्रकारितेच्या घसरलेल्या स्तरावर कडाडून टीका
काही माध्यमांनी एकनाथ शिंदेंसोबत झालेल्या कथित गुप्त बैठकीत अरविंद सावंतांचे नाव गोवल्याने ते प्रचंड संतापले होते. “कालपर्यंत इतरांची नावे होती, आज माझंही नाव घातलं. ही पत्रकारिता विकली गेल्याचं जिवंत उदाहरण आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. कथित बैठकीत व्हिडिओ कॉलवर असल्याच्या दाव्याला आव्हान देताना ते म्हणाले की, “मी माझे सर्व फोन देतो, त्यात जर मी बोललो असेल, तर तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आहे.”

“मंत्रीपद सोडताना विचार केला नाही, निष्ठा काय सोडणार?”
आपल्या राजकीय प्रवासाची आठवण करून देताना सावंत भावूक झाले. उद्धव ठाकरेंच्या एका फोनवर आपण केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता, याची आठवण त्यांनी करून दिली. “बाळासाहेबांनी आमदार केलं आणि साहेबांनी खासदार. त्यांच्याशी बेईमानी करणं म्हणजे आईच्या दुधाशी प्रतारणा करण्यासारखं आहे,” असे ते म्हणाले. शेवटच्या श्वासापर्यंत ठाकरेंसोबतच राहण्याचा आणि बाळासाहेबांच्या विचारांशी ठाम राहण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा – Eknath Shinde: ठाकरेंचे 8 खासदार फुटणार असल्याच्या चर्चांवर अखेर एकनाथ शिंदेंनी सोडलं मौन; म्हणाले, ‘गेल्या दीड वर्षांपासून तेच…’

बदनामीचा खटला आणि ‘ऑपरेशन टायगर’वर भाष्य
या प्रकरणावरून केवळ अरविंद सावंतच नव्हे, तर खासदार ओमराजे निंबाळकर आणि राजाभाऊ वाजे यांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे. “आमची नाहक बदनामी केली जात असून, याप्रकरणी मी न्यायालयात बदनामीचा खटला दाखल करणार आहे,” असा इशारा सावंतांनी दिला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोणतीही बैठक झाली नसून, हे केवळ ‘ऑपरेशन टायगर’च्या नावाखाली पसरवलेले खोटे वृत्त असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या स्पष्टीकरणामुळे तूर्तास खासदार फुटीच्या चर्चांना ठाकरे गटाकडून पूर्णविराम देण्याचा प्रयत्न झाला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number