स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर राज्यातील राजकीय वातावरणात बदल दिसत असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंद यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आता फक्त निवडणूक निकालांवर न थांबत, पक्षाच्या अंतर्गत यंत्रणेला अधिक मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. उपमुख्यमंत्री एकनात शिंदेंनी 2029 च्या लोकसभा निवडणूकीचा विचार करून मंगळवारी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघातील नव्या संपर्क प्रमुखांची घोषणा शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून करण्यात आली आहे.
यानुसार मुंबईतील सहा आणि ठाण्यातील सात लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुखपदी डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव जाहीर झाले आहे. तसेच मुंबईतील प्रत्येकी दोन लोकसभा मतदारसंघ विभागून त्यासाठी राज्यमंत्री योगेश कदम, माजी खासदार राहुल शेवाळे आणि आमदार निलेश राणे यांची नेमणूक करण्यात आली आहे. शिवाय भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी खासदार नरेश म्हस्के यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर नाशिक लोकसभेची जबाबदारी आमदार सुहास कांदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
यावेळी नंदुरबार लोकसभेसाठी माजी आमदार शिरीष चौधरी यांचे नाव जाहीर केले आहे. तर धुळे आणि दिंडोरी लोकसभा संपर्क प्रमुख म्हणून शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जळगावसाठी आमदार दिलीप लांडे, रावेरसाठी आमदार तुकाराम काते, अहिल्यानगरसाठी राम रेपाळे तर शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी खासदार डॉ. ज्योती वाघमारे, कोल्हापूर, मावळ आणि पुणे लोकसभा मतदारसंघासाठी उद्योग मंत्री उदय सामंत हे संपर्क प्रमुख असतील.
यावेळी सर्व लोकसभा मतदारसंघासाठी संपर्क प्रमुख नेमून शिवसेनेने गरज पडल्यास स्वबळाची तयारी ठेवली आहे. त्यासाठी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते संपूर्ण राज्यभर संपर्क विस्तारण्यास सुरुवात करत असून, स्थानिक स्तरावर सक्रियतेला चालना देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये जिल्हास्तर, तालुका स्तर तसेच गाव स्तरावर नवीन संघटनात्मक यंत्रणा मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. या प्रयत्नांमुळे पक्षाची जमीनवर सक्षमता वाढेल आणि आगामी निवडणुकींसाठी रणनीती अधिक प्रभावी होईल.