सातारा: राजकारणाचा धुरळा आणि सत्तेची समीकरणे यातून वेळ मिळाला की नेत्यांची पावले साहजिकच गावाकडे वळतात. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपसोबत युती करत शिवसेनेला थेट 'नंबर दोन'चा पक्ष बनवणारे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याला अपवाद नाहीत. अनेक महापालिकांवर सत्ता मिळवून मुंबईतील राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानातून उसंत घेत, शिंदे पुन्हा एकदा साताऱ्यातील त्यांच्या 'दरे' या मूळ गावी दोन दिवसांच्या मुक्कामासाठी पोहोचले. तिथे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा एक वेगळाच, शेतीशी एकरूप झालेला चेहरा पाहायला मिळाला.
राजकारणात 'वादळापूर्वीची शांतता' असा एक शब्दप्रयोग कायम वापरला जातो. योगायोग असा की, राज्याच्या राजकारणात काही मोठ्या घडामोडी घडण्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कायमच दरे गावी जातात, असा आजवरचा प्रघात राहिला आहे. काही दिवसांपूर्वीच ते नाराज होऊन गावी गेल्याच्या वावड्या उठल्या होत्या, ज्याचे त्यांनी नंतर स्पष्ट शब्दांत खंडन केले होते. मात्र, राजकीय चर्चा आणि तर्कवितर्कांना फाटा देत, यावेळी त्यांचा दोन दिवसांचा दरे गावचा दौरा पूर्णपणे 'बळीराजाच्या' भूमिकेला समर्पित असल्याचे दिसून आले.
राज्याचे उपमुख्यमंत्री हे अत्यंत महत्त्वाचे आणि व्यग्र पद सांभाळत असतानाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमधील शेतकरी आजही तितकाच जिवंत आहे. गेल्या वर्षी त्यांनी आपल्या शेतात लावलेल्या सफरचंदाच्या बागेला आता फळे धरू लागली आहेत. केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता त्यांनी चक्क काजू, आवळा आणि थेट अवकाडोसारख्या परदेशी फळांची तसेच ब्रोकलीचीही यशस्वी लागवड करून दाखवली आहे.
साताऱ्याच्या लाल मातीत कुठली नवीन झाडे तग धरू शकतात आणि चांगल्या प्रकारे वाढू शकतात, याचे जणू एक प्रयोगशील कृषी विद्यापीठच शिंदे यांनी त्यांच्या शिवारात उभे केले आहे.
यामागे त्यांचा एक अतिशय स्पष्ट आणि दूरगामी हेतू आहे. दरे आणि आजूबाजूच्या परिसरात पूर्वी केवळ भात आणि नाचणी या दोनच पिकांचे प्राबल्य होते. मात्र, आता इथल्या शेतकऱ्यांनी 'बारामाही शेती' करावी, असा शिंदे यांचा आग्रह आहे. गव्हापासून ते हरभऱ्यापर्यंत आणि अगदी दर्जेदार उसाच्या लागवडीपर्यंत सर्व काही या जमिनीत शक्य आहे, हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणातून सिद्ध केले आहे. याशिवाय बटाटे, कांदे, हिरवी मिरची आणि विविध पालेभाज्यांचे विक्रमी उत्पादन घेऊन त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांसमोर एका नव्या कृषी-क्रांतीचा आदर्श ठेवला आहे.
मातीची ओढ आणि शेतीतील या नवनवीन प्रयोगांमधून मिळालेली नवी ऊर्जा सोबत घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी आपला दोन दिवसांचा दौरा संपवून पुन्हा मुंबईकडे रवाना होणार आहेत. 'सत्ताधीश' असण्यापेक्षा 'भूमीपुत्र' असण्याचा अभिमान त्यांच्या या कृतीतून प्रकर्षाने जाणवतो. सत्तेची शिखरं सर करत असतानाही स्वतःचे पाय जमिनीवर कसे घट्ट रोवून ठेवायचे आणि मातीचा विकास कसा साधायचा, याचाच जणू हा एक वस्तुपाठ आहे.
मात्र, त्यांच्या या प्रत्येक दौऱ्यामागे केवळ 'विश्रांती' असते की आगामी कोणत्याही मोठ्या राजकीय वादळापूर्वीची ही 'शांतता' आहे, या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. महापालिका निवडणुकीतील यशानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या शिंदे यांच्या या दौऱ्यानंतर राज्यात कोणत्या नवीन राजकीय हालचालींना वेग येतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.