DINO MOREA: मिठी नदी गाळ प्रकरणी अभिनेता डिनो मोरियाची ईडी चौकशी

मिठी नदी गाळ कंत्राटातील 65 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात अभिनेता डिनो मोरिया गुरूवारी चौकशीसाठी सक्त वसुली संचलनालयाच्या (ईडी) मुंबई कार्यालयात हजर झाला.

DINO MOREA: मिठी नदी गाळ प्रकरणी अभिनेता डिनो मोरियाची ईडी चौकशी

चंद्रकांत शिंदे. मुंबई: मिठी नदी गाळ कंत्राटातील 65 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात अभिनेता डिनो मोरिया गुरूवारी चौकशीसाठी सक्त वसुली संचलनालयाच्या (ईडी) मुंबई कार्यालयात हजर झाला. त्याच्यासह सुमारे आठ जणांना समन्स बजावले होते. याप्रकरणी ईडीने 13 आरोपीसह डिनो मोरियाच्या घरासह 15 हून अधिक ठिकाणी शोधमोहीम राबवली होती. त्यात मुंबई आणि कोची येथील ठिकाणांचा समावेश होता. डिनो मोरिया युवा सेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांचा निकटवर्ती मानला जातो.

ईडीने छाप्यांपूर्वी आरोपी आणि संशयितांनी कथित गैरव्यवहाराच्या कालावधीत संपादित केलेल्या मालमत्ता आणि त्या मालमत्ता खरेदीसाठी वापरलेल्या पैशांच्या स्रोताची तपासणी सुरू केली होती. छाप्यांमध्ये जप्त कागदपत्र आणि मालमत्तांच्या पडताळणीबाबत आठ जणांना ईडीने समन्स पाठवले होते. त्यात डिनो मोरियाचाही समावेश आहे. 

याप्रकरणी, तीन पालिका अधिकारी, पाच कंत्राटदार, तीन मध्यस्थी आणि दोन कंपन्यांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गैरव्यवहारामुळे पालिकेला 65 कोटी 54 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. त्या गुन्ह्यांच्या आधारावर ईडी याप्रकरणी तपास करीत आहे. याप्रकरणी ईडीने मुंबईत 15 हून अधिक ठिकाणी छापे टाकले, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. त्यात कोचीतील एका ठिकाणांसह डिनो मोरियाच्या वांद्रे येथील निवासस्थानाचाही समावेश आहे.

याप्रकरणातील आरोपी केतन कदम व डिनो मोरिया यांच्यात 2019 ते 2022 या कालावधीत काही आर्थिक व्यवहार झाले होते. याच व्यवहारांच्या आधारे डिनो मोरियाची चौकशी करण्यात येत आहे. कदम आणि मोरिया यांची 25 वर्षांपासून ओळख आहे. त्यांच्या व्यवहाराबाबत माहिती घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी डिनो मोरिया आणि त्याच्या भावाची चौकशी केली होती. आता ईडी याच प्रकरणात डिनोची चौकशी करीत आहे.

हेही वाचा: 'नरेंद्र मोदी अमेरिकेपुढे सरेंडर का झाले?'; नाना पटोलेंचा भाजपला सवाल

याप्रकरणी महापालिकेचे सहाय्यक अभियंते प्रशांत रामुगडे, उपमुख्य अभियंते गणेश बेंद्रे आणि तायशेट्टे (निवृत्त), तसेच ॲक्युट डिझायनिंग, कैलाश कन्स्ट्रक्शन कंपनी, एनए कन्स्ट्रक्शन, निखिल कन्स्ट्रक्शन आणि जेआरएस इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांचे संचालक दीपक मोहन, किशोर मेनन, जय जोशी, केतन कदम आणि भूपेंद्र पुरोहित यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 406, 409, 420, 465, 467, 468,471, 120-ब अंतर्गत मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यात जोशी, कदम आणि पुरोहित मध्यस्थी आहेत. आरोपींनी कट रचून पालिकेचे 65 कोटी 54 लाख रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number