अमरावती: यंदा राज्यातील काही जिल्ह्यांत प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. राज्यात अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे शेकऱ्यांची पिके अक्षरक्ष: पाण्याखाली गेली, ज्यामुळे शेती नष्ट झाली. इतकंच नाही, तर हातातोंडाशी आलेला घास गमावल्याने शेतकरी उदास आहेत. सोबतच, नुकसानीचे पंचनामे वेळेत न झाल्याने शेतकऱ्यांचा संताप वाढत चालला आहे. या समस्यांना कंटाळून अमरावतीतील एका शेतकऱ्याने अनोख्या पद्धतीने संबंधित परिस्थितीचा निषेध केला आहे. विशेष बाब म्हणजे, या शेतकऱ्याने चक्क नुकसानीचं निमंत्रणपत्र छापून प्रशासनाचं लक्ष वेधलं आहे.
निमंत्रण पत्रिकेत शेतकऱ्याने लिहिले की, 'शेतमाऊलीच्या कृपेने, आपणांस कळविण्यात आनंद होत आहे की यावर्षी आम्ही शेतकरी बांधवांनी दरवर्षीप्रमाणे आमच्या शेतात सोयाबीन पिकाची लागवड केली आहे. मात्र, अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे संपूर्ण पिकांचे नुकसान झाले आहे. तरी आपल्या विभागाला वारंवार सांगूनही शेताची पाहणी करण्यासाठी कोणीही येऊ शकले नाही. आपणांस आमंत्रित करण्यास अत्यंत आनंद होत आहे की 22 सप्टेंबर 2025 रोजी घटस्थापनेच्या मुहूर्तावर संपूर्ण पत्रकार बांधवांच्या उपस्थितीमध्ये सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर आणि रोटाव्हेटर फिरवण्याचा कार्यक्रम ठरविला आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे, ही विनंती. आल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे. स्थळ: आमचे शेत, शेंदोळा बु. मैजे सुजातपूर ता. तिवसा जि. अमरावती'. शेतकऱ्याच्या या आगळ्या वेगळ्या निमंत्रण पत्रिकाची राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. या निमंत्रण पत्रिकेमुळे प्रशासन जागे होईल का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

राज्यातील 'या' जिल्ह्यात येलो अलर्ट
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, '23 सप्टेंबर रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नगिरी, पुणे, कोल्हापूर, आदी. जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, 24 सप्टेंबर रोजी अहिल्यानगर, पुणे, नाशिक, आदी. जिल्ह्यात विजांच्या गडगटांसह हलक्या ते मध्यम स्वरुपात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आली आहे'.