मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनत आहे. या संघर्षाचे पडसाद आता इतर देशांवरही उमटताना दिसत आहेत. भारतामध्ये अनेक ठिकाणी LPG गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमिवर भारतासह इतर देशातील गॅस एजन्सींनी व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा थांबवला आहे. महाराष्ट्रातही सिलेंडरची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. याचपार्श्वभूमिवर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत निवेदन मांडले आहे.
हेही वाचा- LPG Cylinder vs Biomass Gas Shegdi : गॅस सिलेंडरला पर्याय बायोमास शेगड्या, उद्योजकाने सांगितला प्लॅन
“एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. हे दर केंद्र शासन ठरवतं आणि त्यांनी सुमारे 60 रुपयांची वाढ केली आहे. मात्र, हे लक्षात घेतले पाहिजे की, भारत सरकारकडून दर महिन्याला प्रति सिलेंडर 300 रुपये इतके अनुदान दिले जाते. तसंच, महाराष्ट्र शासनाकडूनही तीन सिलेंडर देण्याची योजना आहे. सध्याच्या परिस्थितीत 60रुपयांची वाढ करण्यात आली आहे. एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी राज्य शासनाकडून सर्व संबंधित यंत्रणांना सुचना दिली आहे. तसंच या संदर्भात राज्य स्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून व्हॉट्सएप क्रमांक 9769919221 जारी करण्यात आला आहे. रिफायनऱ्यांमधील एलपीजी उत्पादन वाढवण्यात आले आहे. रिफायनऱ्या पूर्ण क्षमतेने कार्यरत असून एलपीजी आणि पीएनजीचे उत्पादन सुरू आहे. इंधन उपलब्धतेबाबत योग्य ती माहिती दिली जात आहे. काळाबाजार रोखण्यासाठी कारवाई सुरू असून नागरिकांमध्ये घबराट पसरू नये म्हणून दररोज रेडिओ, एफएम, दूरदर्शन आणि मुद्रित माध्यमांद्वारे माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या खोट्या बातम्यांविरोधातही जनजागृती केली जात आहे. रिफायनरीतील एलपीजी उत्पादन 9,000 मेट्रिक टनांवरून 11,000 मेट्रिक टनांपर्यंत वाढविले आहे.” अशी माहिती भुजबळांनी दिली.