दुबई: पश्चिम आशियातील तणावाचा परिणाम आता अन्नपुरवठ्यावरही दिसू लागल्याची चिन्हे समोर येत आहेत. इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे तसेच इराणने होर्मूज सामुद्रधुनी बंद केल्यामुळे संयुक्त अरब अमिरातीमध्ये अन्नटंचाईची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः दुबईमध्ये ताज्या फळे-भाज्यांच्या साठ्याबाबत चिंता वाढू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुबईमध्ये ताज्या फळे आणि भाज्यांचा साठा अत्यंत मर्यादित राहिला असून तो फक्त आठ ते दहा दिवसांसाठी पुरेल इतकाच असल्याचे सांगितले जात आहे. 7 मार्चपर्यंत हा साठा केवळ आठ दिवसांचा उरल्याची माहिती काही अहवालांमध्ये नमूद करण्यात आली आहे. होर्मूज सामुद्रधुनी बंद झाल्यानंतर या प्रदेशातील महत्त्वाच्या समुद्री मार्गांवर परिणाम झाला असून आंतरराष्ट्रीय व्यापारात अडथळे निर्माण झाले आहेत.
तज्ज्ञांच्या मते, जर समुद्री व्यापार आणि मालवाहतुकीची स्थिती लवकर सुधारली नाही, तर या प्रदेशात अन्नपुरवठ्याचे संकट अधिक गंभीर होऊ शकते. लॉजिस्टिक्स क्षेत्रातील तज्ज्ञ स्टीफन पॉल यांनी स्वित्झर्लंडमधील एका माध्यमाशी बोलताना दुबईतील ताज्या अन्नसाठ्याबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यांच्या कंपनीने केलेल्या सप्लाय चेन विश्लेषणानुसार हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
खाडी देश मोठ्या प्रमाणावर अन्नपदार्थ आयातीवर अवलंबून आहेत. अंदाजे 80 ते 90 टक्के अन्नधान्य आणि खाद्यपदार्थ हे इतर देशांतून आयात केले जातात. गल्फ कोऑपरेशन कौन्सिल देशांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांपैकी सुमारे 70 टक्के माल होर्मूज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या समुद्री मार्गाने पोहोचतो. हा मार्ग बंद झाल्याने व्यापार आणि पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला आहे. याशिवाय इराण-इस्रायल संघर्षामुळे हवाई मालवाहतुकीवरही परिणाम होत असल्याचे सांगितले जाते.
तथापि, संयुक्त अरब अमिरातीच्या सरकारने नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. यूएईच्या अर्थ मंत्रालयाने सांगितले की देशाकडे आवश्यक वस्तूंचा चार ते सहा महिन्यांचा रणनीतिक साठा उपलब्ध आहे. त्यामुळे तातडीची अन्नटंचाई निर्माण होण्याची शक्यता कमी असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पुरवठा कायम ठेवण्यासाठी मोठ्या किरकोळ विक्री कंपन्यांनीही पर्यायी उपाययोजना सुरू केल्या आहेत. लुलू ग्रुप सारख्या रिटेल कंपन्यांनी भारतासह इतर देशांतून ताजी फळे-भाज्या आणण्यासाठी चार्टर्ड कार्गो विमानांचा वापर सुरू केला आहे. या माध्यमातून पुरवठा साखळी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले जात आहे.