मुंबई: राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना e-KYC करणे बंधनकारक केले आहे. e-KYC म्हणजे इलेक्ट्रॉनिक नो युवर कस्टमर होय. ही प्रक्रिया करण्यासाठी पूर्ण करण्यासाठी महिलांना दोन महिन्यांची मुदत दिली आहे. अनेक महिलांनी केवायसी करण्यासाठी ऑनलाईन पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या संधीचा गैरफायदा घेऊन गूगलवर अनेक बनावट वेबसाईट सक्रिय झाल्या आहेत. अशा वेबसाईटमुळे महिलांचे बँक खाते रिकामे होऊ शकते.
e-KYC चा नवा नियम आणि त्याचे कारण
महिला व बालविकास मंत्रालयाने जाहीर केले की, या योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना दरवर्षी जून महिन्यात e-KYC करणे अनिवार्य असेल. हा नियम लागू करण्याचे मुख्य कारण म्हणजे, एका तपासणीत सुमारे 26.34 लाख अपात्र लोक, ज्यात पुरुषही समाविष्ट होते, या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले. या डिजिटल पडताळणीमुळे केवळ पात्र महिलांपर्यंतच योजनेचा लाभ पोहोचेल आणि फसवणूक थांबेल, असे सरकारचे म्हणणे आहे.
e-KYC या अधिकारीकृत पोर्टलवरच करा
अपात्र वेबसाइट्सपासून दूर राहण्यासाठी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, e-KYC फक्त आणि फक्त सरकारच्या अधिकृत पोर्टलवर, म्हणजे
https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc या वेबसाईटवर करावी. गूगल सर्चमध्ये दिसणाऱ्या इतर कोणत्याही लिंकवर चुकूनही क्लिक करु नका.
मागील काही दिवसांपासून, hubcomut.in सारखी एक बनावट वेबसाइट समोर आली आहे. ही वेबसाइट KYC शी संबंधित माहिती शोधताना गूगलवर दिसते. जर एखाद्या महिलेने अशा वेबसाइटवर आपली वैयक्तिक माहिती भरली, तर तिचे बँक खाते आणि इतर वैयक्तिक डेटा हॅक होण्याचा धोका असतो. यामुळे खात्यातून पैसे काढले जाण्याची आणि सायबर फसवणुकीची शक्यता वाढते.
e-KYC करणे का महत्त्वाचे?
अपात्र लोकांना योजनेतून वगळण्यासाठी, लाभ थेट पात्र महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी, सरकारी योजनांमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी e-KYC करणे महत्त्वाचे आहे. भविष्यात डिजिटल पडताळणीमुळे इतर योजनांचा लाभ घेणे सोपे होईल.