पुरोगामी महाराष्ट्रात आजही जात संपली नसल्याचे धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. एका बौद्ध धर्माच्या मुलासोबत कोर्ट मॅरेज करणाऱ्या तरुणीला तिच्याच आई-वडिलांनी हळदीच्या दिवशी गायब केल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीतून उघडकीस आला आहे. 8 वर्षांचे प्रेम, त्यानंतर कायदेशीर लग्न आणि लग्नाचा हॉल बुक झालेला असतानाच, हळदीच्या दिवशी मुलीचे आई-वडील घराला कुलूप लावून मुलीसह पसार झाले आहेत.
ओंकार बनसोडे असं या तरुणाचं नाव असून त्याचे कॉलेजमध्ये असताना एका तरुणीसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यांच्या या नात्याला 8 वर्ष उलटून गेली होती. ज्यावेळेस ती लग्नाच्या वयाची झाली तेव्हा तिच्या घरच्यांनी तिच्यासाठी स्थळ पाहण्यास सुरुवात केली. याची माहिती तिला कळताच तरुणीने ओंकार आणि तिच्या नात्याबद्दल घरच्यांना सांगितले. मात्र ओंकार बौद्ध धर्माचा असल्यामुळे तरुणीच्या आई-वडिलांनी तिला बेदम मारहाण केली.
लग्नाला तरुणीच्या घरच्यांचा विरोध असल्याने तरुणी आणि ओंकार यांनी ठाणे न्यायालयात जाऊन कायदेशीर विवाह केला. कोर्ट मॅरेजनंतर दोन दिवस तरुणी ओंकारसोबतच राहत होती. मात्र त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिला गायब केले असल्याचा आरोप ओंकारने तिच्या घरच्यांवर केला आहे. याप्रकरणी हताश झालेल्या ओंकारने अखेर पोलिसांत धाव घेत, पत्नी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. मुलगा परजातीचा आहे म्हणून मुलीला घेऊन झालेल्या कुटुंबीयांवर डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली आहे.