Difference Between Lpg Cng & Png: आजच्या आधुनिक जीवनात गॅसशिवाय दैनंदिन कामांची कल्पनाही करता येत नाही. घरातील स्वयंपाक असो, वाहनांचे इंधन असो किंवा औद्योगिक वापर अनेक ठिकाणी विविध प्रकारचे गॅस वापरले जातात. एलपीजी, सीएनजी आणि पीएनजी हे शब्द आपण नेहमी ऐकतो, पण या तिन्ही गॅसमध्ये नेमका काय फरक आहे, हे मात्र अनेकांना माहीत नसते. प्रत्यक्षात या तिन्ही प्रकारांच्या वापराची पद्धत, रचना आणि उपयोग वेगवेगळे आहेत.
घराघरात वापरला जाणारा LPG
भारतातील बहुतेक घरांमध्ये स्वयंपाकासाठी वापरला जाणारा गॅस म्हणजे एलपीजी. हा गॅस सिलेंडरच्या स्वरूपात घरापर्यंत पोहोचवला जातो. पेट्रोलियम पदार्थांच्या शुद्धीकरण प्रक्रियेदरम्यान तयार होणाऱ्या काही वायूंना विशिष्ट दाबाखाली द्रवरूपात बदलून एलपीजी तयार केला जातो. त्यामुळे छोट्या सिलेंडरमध्येही मोठ्या प्रमाणात ऊर्जा साठवणे शक्य होते. स्वयंपाकासाठी हा गॅस अत्यंत सोयीस्कर मानला जातो. मात्र गळती झाल्यास हा गॅस हवेपेक्षा जड असल्याने जमिनीवर साचण्याची शक्यता असते, त्यामुळे काळजी घेणे आवश्यक असते.
पाइपद्वारे मिळणारा PNG
मोठ्या शहरांमध्ये गेल्या काही वर्षांत पाइपद्वारे गॅस पुरवठा करण्याची व्यवस्था सुरू झाली आहे. यालाच पीएनजी म्हणजेच पाइप्ड नॅचरल गॅस म्हणतात. या प्रकारात सिलेंडरची गरज नसते. गॅस थेट पाइपलाइनच्या माध्यमातून घरातील शेगडीपर्यंत पोहोचतो. त्यामुळे सिलेंडर बुकिंग, वितरण किंवा संपण्याची चिंता राहत नाही. वापरानुसार महिन्याच्या शेवटी बिल येते, अगदी वीज बिलाप्रमाणे. या गॅसचा मुख्य घटक नैसर्गिक वायू असल्याने तो हवेपेक्षा हलका असतो. त्यामुळे गळती झाल्यास तो हवेत मिसळून पसरतो आणि अपघाताचा धोका तुलनेने कमी असतो.
वाहनांसाठी वापरला जाणारा CNG
वाहनांमध्ये वापरला जाणारा सीएनजी हा देखील नैसर्गिक वायूचाच एक प्रकार आहे. मात्र त्याला खूप जास्त दाबाखाली साठवून ठेवले जाते. पेट्रोल किंवा डिझेलच्या तुलनेत हा इंधन प्रकार स्वस्त पडतो आणि प्रदूषणही कमी करतो. म्हणूनच शहरांमध्ये बस, टॅक्सी, ऑटो आणि अनेक खासगी गाड्यांमध्ये सीएनजीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पर्यावरणपूरक इंधन म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे.
LNG म्हणजे काय?
याशिवाय एलएनजी नावाचा गॅसही मोठ्या प्रमाणावर वापरला जातो, विशेषतः आंतरराष्ट्रीय व्यापारात. नैसर्गिक वायूला अतिशय कमी तापमानात थंड करून त्याचे द्रवरूप केले जाते. त्यामुळे त्याचे आकारमान मोठ्या प्रमाणात कमी होते आणि जहाजांद्वारे एका देशातून दुसऱ्या देशात वाहतूक करणे सोपे होते. जगातील अनेक देश ऊर्जा पुरवठ्यासाठी एलएनजीवर अवलंबून असतात.
सुरक्षितता सर्वात महत्त्वाची
गॅस कोणताही असो, सुरक्षितता ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. गळती टाळण्यासाठी योग्य उपकरणे, नियमित तपासणी आणि काळजी घेणे आवश्यक असते. वेगवेगळ्या प्रकारचे गॅस आपल्या दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या कारणांसाठी वापरले जात असले तरी त्यांच्या योग्य वापरामुळेच ऊर्जा व्यवस्थापन अधिक सुरक्षित आणि परिणामकारक ठरते.