सध्या बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंह याच्या ‘धुरंधर 2’ चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने जगभरात 1300 कोटी रुपयांहून अधिक कमाई करत मोठा विक्रम केला आहे. विशेष म्हणजे, हा आकडा पहिल्या भागाच्या एकूण कमाईइतकाच आहे. या यशामुळे केवळ बॉलिवूडच नव्हे, तर दक्षिणेकडील चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि दिग्दर्शकही प्रभावित झाले आहेत.
दिग्दर्शक आदित्य धर याच्या या चित्रपटात त्याची पत्नी आणि अभिनेत्री यामी गौतम हिने छोटेखानी पण प्रभावी भूमिका साकारली आहे. हॉस्पिटलमधील एका सीनमध्ये नर्सच्या भूमिकेत दिसत ती शत्रूंना संपवताना दिसते. तिच्या या भूमिकेने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.
याचदरम्यान ‘राजी’ चित्रपटाच्या सीक्वलबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. 2018 साली प्रदर्शित झालेल्या राजी या स्पाय थ्रिलर चित्रपटात आलिया भट्ट हिने प्रमुख भूमिका साकारली होती. हा चित्रपट मेघना गुलजारने दिग्दर्शित केला होता, तर करण जौहर याने निर्मिती केली होती. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता.
हा चित्रपट लेखक हरिंदर सिक्का याच्या ‘कॉलिंग सहमत’ या कादंबरीवर आधारित होता. मात्र, आता अनेक वर्षांनंतर सिक्का याने चित्रपटाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्याच्या मते, चित्रपटात मुख्य पात्रांचे सादरीकरण योग्य पद्धतीने झाले नाही.
या सर्व चर्चांना सुरुवात एका सोशल मीडिया पोस्टमुळे झाली. एका युजरने सिक्का याला टॅग करत यामी गौतमसोबत ‘राजी’चा रीमेक करण्याची सूचना केली. त्यावर सिक्का याने यामी ही उत्कृष्ट अभिनेत्री असल्याचे म्हटले, पण पैशांची गरज नसल्याचे स्पष्ट केले. यानंतर दुसऱ्या एका युजरने सीक्वलबाबत विचारले असता सिक्का याने “नो कमेंट” असे उत्तर दिले.
यामुळे चाहत्यांमध्ये ‘राजी’चा सीक्वल किंवा रीमेक येणार का, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. मात्र, अद्याप अधिकृतरीत्या कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान, सिक्का याची सोशल मीडियावर काही पुस्तकांचे फोटो शेअर करत ‘राजी’ संदर्भातील काही निर्णयांवर नाराजी व्यक्त केली असून, मेघना गुलजारची निवड ही त्यांची चूक असल्याचेही नमूद केले आहे.
Calling Sehmat #Raazi ranks among the top books on espionage ever written, globally. It exposes Pakistan across border, hostile forces in Bollywood & a Punjab-based criminals within. Appointing Meghna Gulzar was my gravest misjudgment. Despite clear warnings, I failed to… pic.twitter.com/RZHxAwdmSq — Harinder S Sikka (@sikka_harinder) March 29, 2026
सध्या तरी ‘धुरंधर 2’च्या यशाच्या पार्श्वभूमीवर या सर्व चर्चांना अधिक रंग चढला असला, तरी ‘राजी’च्या सीक्वलबाबत ठोस माहिती येण्यासाठी चाहत्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.