नागपूर: राज्यात आज महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदान होत असून, लोकशाहीच्या या उत्सवात विविध राजकीय पक्षांचे नेते आणि पदाधिकारी मोठ्या उत्साहात मतदानाचा हक्क बजावत आहेत. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची रांग पाहायला मिळत असून, राज्यभरात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. काही वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मातोश्री यांच्यासह ते नागपुरात दाखल झाले होते. नागपूरमधील धरमपेठ परिसरातील झोन क्रमांक 2 मधील प्रभाग क्रमांक 15 येथील आदर्श महिला मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केले.
या संदर्भातील अधिक माहिती ‘जय महाराष्ट्र’ न्यूजचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी दिली आहे. मतदान केंद्रावर मुख्यमंत्र्यांच्या आगमनावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांतपणे रांगेत उभे राहून मतदानाचा अधिकार बजावला. मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत नागरिकांना घराबाहेर पडून मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे अत्यंत आवश्यक आहे. मतदानाचा हक्क बजावणे हे केवळ अधिकार नसून कर्तव्यही आहे, असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, मतदानानंतर बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईऐवजी मार्कर वापरण्यात येत असल्याबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, या सर्व बाबी भारतीय निवडणूक आयोग ठरवत असतो आणि यापूर्वीही अनेक वेळा मार्कर पेनचा वापर करण्यात आला आहे. तथापि, कोणाला काही आक्षेप असल्यास निवडणूक आयोगाने त्याची दखल घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
यासोबतच मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “मला असे वाटते की काही लोक उद्याच्या निकालापूर्वीच या निकालाचा अंदाज बांधून, निकालानंतर दोष कुणावर टाकायचा याची तयारी करत आहेत. हे चित्र सध्या स्पष्टपणे दिसत आहे,” असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.