मुंबई, ३० ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा पक्ष चांगलाच कामाला लागलेला आहे. भाजपा सरकारने केलेली कामे प्रत्येक सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहोचावेत यासाठी भाजपाकडून प्रयत्न केले जात आहेत. याशिवाय आगामी निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक मतदान व्हावं यासाठी नागरिकांना सरकारच्या प्रत्येक कामांबद्दल माहिती दिली जात आहे. भापाकडून प्रचारासाठी वेगवगळ्या माध्यमांचा वापर केला जातोय. यामध्ये सोशल मीडियाचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे भाजपा नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाच्या सोशल मीडिया हाताळणाऱ्या कार्यकर्त्यांना मोलाच्या सूचना आणि आदेश दिले आहेत.
आगामी निवडणुकांसाठी कामाला लागा, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केलं. “सोशल मीडियावर विरोधकांना उत्तर देताना शिवीगाळ करु नका”, अशी सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दादरच्या सोशल मीडिया कार्यशाळेत देवेंद्र फडणवीस यांनी हा सल्ला दिला आहे. विरोधकांकडून खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. असं देखील फडणवीस यावेळी म्हणाले.